नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, तर पक्षाचे दोन विद्यमान आमदार पराभूत झाले. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. मोहन हंबर्डे हे २००८ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते. पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून नांदेड दक्षिण मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विजय मिळवला होता, त्यामुळे ते अशोक चव्हाण यांचे विश्वासू समजले जात.
मात्र, यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेना शिंदे गटाचे आमदार आनंद बोढारकर यांच्याकडून केवळ दोन हजार मतांनी निसटता पराभव झाला. या पराभवामुळे हंबर्डे काँग्रेसच्या कार्यक्रमांपासून अलिप्त राहिल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक झाल्यापासून त्यांनी काँग्रेसच्या कोणत्याही उपक्रमात सहभाग घेतला नाही.
माजी आमदार मोहन हंबर्डे लवकरच अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे समजते. निवडणुकीतील पराभवानंतर हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नांदेडमधील स्थानिक राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत आहेत. पक्षवाढीसाठी ते मोठ्या राजकीय चेहऱ्यांना आपल्या गटात सामील करण्याचे प्रयत्न करत आहेत. हंबर्डे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नांदेडमधील राजकीय ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाची संधी मिळेल, अशी शक्यता आहे.
हंबर्डे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय भूमिका मिळते आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कोणती दिशा मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.