राज्यात गँगवार सुरूच! शरद मोहोळनंतर आणखी एका गुंडाची हत्या, भर रस्त्यात सपासप वार करून केला शेवट…

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून अनेकांच्या हत्या केल्या जात आहेत. पुण्यासह मुंबई आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे. आता नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

माथाडीच्या साईटवरुन झालेल्या वादातून पाच हल्लेखोरांनी नेरुळमध्ये राहणाऱ्या गुंड चिराग महेश लोके याची निर्घुणपणे हत्या केली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रमाणेच ही हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये गुंड लोके याची पत्नी प्रियंका लोके या देखील जखमी झाल्या आहेत.

त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत चिराग लोके हा नेरुळ सेक्टर-20 मध्ये राहत होता. तो अरुण गवळी व शरद मोहोळ या टोळीसाठी काम करत होता. पोलिसांनी त्याच्यावर काही दिवसांपुर्वी मोक्कांतर्गत कारवाई केली होती.

चिराग लोके व त्याची पत्नी हे दोघे त्यांच्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात असताना आरोपी अरविंद सोडा व त्याच्या साथीदारांनी त्याला अडवुन लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली होती.यामध्ये तो जबर जखमी झाला होता. व त्याचे निधन झाले.

पत्नी प्रियंका देखील या हल्ल्यात जखमी झाली आहे. या हल्लेखोरांनी तिच्यावर देखील लोखंडी रॉडने जिवघेणा हल्ला करुन ते पळून गेले. या घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी आरोपी आरोपी अरविंद रामनाथ सोडा, अरबाज, पगला, शेरा व इतर दोन विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान, राज्यात या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पोलीस प्रशासन नेमकं करतंय काय असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.