Jayant Patil : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीबाबत पडळकर म्हणाले की, “यात काही विशेष नाही, कारण जयंत पाटील लढवय्ये नेते नाहीत. संघर्ष आणि जयंत पाटील यांचा काहीच संबंध नाही. ते केवळ वडिलांच्या रिक्त जागी आले, त्यामुळे त्यांना संघर्षाची किंमत माहीत नाही.”
जयंत पाटील म्हणजे “कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस”!
जयंत पाटील हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत आणि सत्ता टिकवण्यासाठी ते लाचार असल्याचा आरोप पडळकर यांनी केला. “त्यांचा प्रभाव आता उरलेला नाही. लोकांनी त्यांना इस्लामपूरपुरते मर्यादित करून ठेवले आहे. यावेळी त्यांच्या विरोधात जर सक्षम उमेदवार उभा राहिला असता, तर ते 50 हजार मतांनी पराभूत झाले असते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस” अशा शब्दांत त्यांनी जयंत पाटलांवर हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले, “मी 40 हजार मतांनी निवडून आलो, तर जयंत पाटील फक्त 11 हजार मतांनी निवडून आले. त्यांच्या प्रभावी गटाचा आता कुठेही परिणाम होत नाही. पुढच्या निवडणुकीत सदाभाऊ खोत किंवा त्यांचा मुलगा सागर देखील उभा राहिला, तरी जयंत पाटील पराभूत होतील.”
लाडकी बहीण योजनेवरही प्रतिक्रिया
राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल बोलताना पडळकर म्हणाले, “या योजनेबाबत अजित पवार काय म्हणाले, ते तुम्ही ऐकलं नाही. मात्र, ही योजना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण विचार करून आणली आहे. विरोधी पक्ष 7 ते 9 हजार रुपये देण्याची भाषा करत होता, मात्र त्यांच्याकडे कोणतेही ठोस आर्थिक नियोजन नव्हते. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये अशा योजनांमुळे बजेट ओव्हरलोड झाले. मात्र, महाराष्ट्रात ही योजना फक्त 7% खर्चात अंमलात आणली जात आहे.”
या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, जयंत पाटील यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.