सध्या भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. तसेच काँग्रेसने ३९ जणांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. असे असले तरी राज्यात एकही उमेदवारी अजून जाहीर करण्यात आली नाही. राज्यात अजून उमेदवारी आणि जागा वाटप झाले नाही.
असे असताना महाराष्ट्रात लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीत २३ जागांवर विजय मिळाला होता. भाजप त्या जागा पुन्हा लढवणार हे स्पष्ट झालेलं आहे. ४८ पैकी राहिलेल्या २५ जागांपैकी १७ जागांवर महायुतीत सहमती झाली नाही.
गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर मार्ग निघाला नाही. दरम्यान, पालघर, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात शिवसेनेनं विजय मिळवला होता इथं भाजपने दावा केला आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे.
तसेच मावळची जागा सेनेनं जिंकली होती, तिथं भाजप आणि राष्ट्रवादीचा देखील दावा आहे. सातारा लोकसभा गेल्यावेळी राष्ट्रवादीनं जिंकली होती, या जागेवर भाजपचा दावा आहे. यामुळे याबाबत चर्चा सुरू आहे. यावर दिल्लीत चर्चा सुरू आहे.
यामुळे जे इच्छुक आहेत, त्यांची धाकधूक वाढली आहे. कोल्हापूर, बुलढाणा, शिर्डी, हिंगोली, यवतमाळ या जागा शिवसेनेने जिंकलेल्या होत्या, इथं भाजपने दावा सांगितलेला आहे. यामुळे या जागेवर देखील चर्चा सुरू आहे.
अमरावती मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ पराभूत झाले होते, ती जागा भाजपला हवी आहे. तसेच धाराशिव या मतदारसंघात शिवसेनेनं विजय मिळवला होता, या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीचा दावा असून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळू शकतो, अशीही चर्चा सुरू आहे.