गेल्या वर्षभरापासून एकनाथ शिंदे गटातील आमदार, खासदार त्यांच्या आक्रमक वागणूकीमुळे चर्चेत आहेत. आता शिंदे गटातील खासदार हेमंत पाटील हे चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी तहसीलदाराला थेट धमकी दिली आहे.
तुमच्या तक्रारी वाढल्या आहेत. तुम्ही काय ब्रिटिशांची औलाद आहे का? अंगात जास्त मस्ती येऊ देऊ नका ती मस्ती एका मिनिटात उतरवीण, अशी धमकी हेमंत पाटील यांनी माहूरच्या तहसीलदारांना दिली आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेमंत पाटील सध्या माहूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. ते माहूरच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत होते. त्यावेळी रात्रीच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. हेमंत पाटील हे तहसीलदारांना तंबी देताना दिसून आले. त्यांच्या या आक्रमकपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
माहूरमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे पैनगंगा नदीला पुर आला होता. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर झाडे झुडपेही पडली आहेत. त्यांची पाहणी करण्यासाठी हेमंत पाटील रात्री दहा वाजेच्या दरम्यान निघाले होते.
हेमंत पाटील हे नागरिकांशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत होते. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी तहसीलदार किशोर यादव यांची तक्रार हेमंत पाटील यांच्याकडे केली. त्यानंतर हेमंत पाटील यांच्या पीएने लगेचच तहसीलदाराला फोन लावला. पण जेवण करत आहे सांगत त्यांनी फोन ठेवला.
अशात हेमंत पाटील यांनी किशोर यादव यांना तातडीने पाहणीस्थळी बोलावून घेतले. पाहणीस्थळी येताच हेमंत पाटील यांनी तहसीलदाराला चांगलेच सुनावले आहे. नागरिकांच्या तक्रारी येत आहे. त्यांची कामे का करत नाहीत? तु काय ब्रिटिशांची औलाद आहे का? लोकांचे प्रश्न कळत नाहीये? असे म्हणत तहसीलदाराला चांगलंच झापलं आहे.