Israel : क्षणात झालं होत्याचं नव्हतं! १४ जणांच्या कुटुंबात फक्त ४ वर्षांची चिमुरडी राहीली जिवंत; ह्रदय हेलावणारी घटना

Israel : हॉस्पिटलमध्ये जेव्हा 4 वर्षांच्या मुलीने डोळे उघडले तेव्हा तिच्यासाठी तो हृदयद्रावक क्षण होता. जखमी मुलीच्या आसपास कोणीही नव्हते. ती इकडे तिकडे पाहत राहिली पण कोणीच दिसले नाही. तिच्या कुटुंबात 14 लोक होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला.

तिच्या कुटुंबामध्ये ती एकमेव वाचलेली आहे. गाझामध्ये इस्रायलने टाकलेल्या बॉम्बमुळे तिचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. फुला अल-लहम नावाची ही मुलगी खान युनूस रुग्णालयात दाखल आहे. तिचे घर मोडकळीस आले आहे.

कुटुंबात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि भावाचा समावेश आहे. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार त्यांच्या घरावर बॉम्ब पडला होता. दुसरीकडे राहणारी तिची आजी सांगते, ‘अचानक, कोणताही इशारा न देता, त्यांनी घरात राहणाऱ्या लोकांवर बॉम्बफेक केला.

माझी नात फुला शिवाय कोणीही वाचले नाही. फुला वगळता सर्वजण मृत्यूमुखी पडले. ती अजिबात बोलत नाही, फक्त ती पलंगावर पडून आहे आणि औषधे दिली जात आहेत. एक प्रकारे फुलाला भाग्यवान मानले जाते कारण ती वाचली आहे.

गाझा अधिकाऱ्यांनी सांगितले की शनिवारपासून 2,450 लोक मरण पावले आहेत. यापैकी एक चतुर्थांश मुले आहेत. याशिवाय सुमारे 10,000 लोक जखमी झाले आहेत. हवाई हल्ल्यात वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत.

शनिवारी सकाळी 6 वाजता पॅलेस्टाईनमधून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने 20 मिनिटांत इस्रायलवर 5000 रॉकेट डागल्याचा दावा केला होता. यानंतर हमासचे दहशतवादी दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. त्यांनी घरे, रस्ते आणि कार्यक्रमांसह सर्वत्र लोकांना गोळ्या घातल्या.

हत्येसोबतच दहशतवाद्यांनी लोकांना लुटले. त्यांची घरे जाळली. याशिवाय त्यांनी दीडशेहून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते. हमासच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या इस्रायली नागरिकांची संख्या आतापर्यंत 1300 च्या पुढे गेली आहे. तर 2000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.