New Delhi : दिल्ली रेल्वे स्टेशनवर एक घोषणा अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, 18 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
New Delhi : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 दरम्यान घडली. प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांसाठी मोठ्या संख्येने भाविक स्टेशनवर पोहोचले होते. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाल्याने प्रवाशांमध्ये घाई माजली, आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
कशामुळे घडली दुर्घटना?
शनिवारी रात्री 8.30 ते 9 च्या सुमारास, प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर उभी असताना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याच वेळी, स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस या गाड्या उशिराने धावत होत्या, त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 12, 13 आणि 14 वर प्रवाशांची संख्या अधिक होती.
रेल्वे दर तासाला 1,500 जनरल तिकिटे विकत होती, त्यामुळे गर्दी अधिक वाढली. अशातच प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा झाल्याने लोक एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्यावर जाण्यासाठी धावू लागले. एस्केलेटरजवळ झालेल्या गोंधळामुळे चेंगराचेंगरी झाली आणि यात 18 जणांचा मृत्यू झाला.
सरकारी मदत आणि उपाययोजना
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, गंभीर जखमींना 2.5 लाख आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जखमींवर उपचार सुरू असून, अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून गर्दी आटोक्यात राहील. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.