Amravati : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे १७ वर्षीय अल्पवयीन युवकाचा अनैसर्गिक कृत्यांनंतर दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाली आहे.
घटनेचा तपशील
मयत युवक श्रीकृष्ण पेठ, मोर्शी येथील रहिवासी होता. आरोपी दिनेश उर्फ गोलु भददु उईके (वय २०, रा. घोडगव्हाण) याने हा अमानवी कृत्य केल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी रात्रीपासून मयत युवक बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी सकाळी शिरभाते मंगल कार्यालयाजवळ युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या.
सीसीटीव्हीने मिळाली महत्त्वाची माहिती
पोलिसांनी तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मयत युवक एका अनोळखी व्यक्तीसोबत जात असल्याचे दिसून आले. संशयाच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता आरोपीची ओळख पटली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
त्या रात्री नेमकं काय घडलं?
आरोपी दिनेश गुरुवारी रात्री मोर्शी येथे दारू पिण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला अल्पवयीन युवक दिसला. आरोपीने युवकाला फसवून शेतामध्ये नेले. त्यानंतर त्याच्याकडे अनैसर्गिक कृत्याची मागणी केली. युवकाने याला विरोध केल्याने आरोपीने त्याच्या डोक्यावर दगडाने आणि काचेच्या बाटलीने हल्ला केला. नंतर त्याने अनैसर्गिक कृत्य करून युवकाचा खून केला.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच अपर अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मोर्शी परिसरात खळबळ उडाली आहे.