Pune : पुण्यात प्रसिद्ध पबमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, घटनेचा Video सोशल मिडीयावर व्हायरल

Pune : पुण्यातील मुंढवा परिसरातील एका पबमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रात्री उशिरा सुरू असलेल्या पबमध्ये राडा
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार मुंढवा येथील एबीसी रोडवरील कापली मॅट्रिक्स बिल्डिंगमधील ‘लोकल पब’ मध्ये शुक्रवारी रात्री घडला. रात्री 12 वाजल्यानंतरही हा पब सुरू होता आणि त्याचदरम्यान दोन गटांमध्ये वाद उफाळून हाणामारी सुरू झाली.
या मारामारीत तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. व्हिडीओमध्ये पबमध्ये मोठी गर्दी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओत काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुण आपसात हाणामारी करताना दिसत आहेत. संगीत सुरू असतानाच अचानक भांडण उफाळले आणि गोंधळ निर्माण झाला. हाणामारीत काही तरुणी देखील पबमध्ये उपस्थित असल्याचे दिसते.
पोलिसांचे दुर्लक्ष?
गेल्या काही दिवसांत मुंढवा परिसरात वाहने तोडफोड, जबरी चोरी आणि हुक्का पार्लर चालवण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, पोलिसांकडून यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रात्री उशिरा सुरू असलेल्या पबकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप केला जात आहे.
पोलिसांची कारवाई होणार का?
या हाणामारीच्या घटनेनंतर आता पोलिसांकडून काही कारवाई केली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पबमधील अशा प्रकारांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पावले उचलली जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.