Sandeep Kshirsagar : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरले होते. या अमानुष हत्येचे फोटो सोशल मीडियावर पसरताच संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती, आणि अखेर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, या घटनेनंतर बीड जिल्ह्यातून सातत्याने नव्या प्रकरणांचा भडिमार सुरू आहे.
नवा व्हिडिओ समोर; आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग?
ताज्या घटनेत बीडमधून मारहाणीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एका शोरूमच्या मॅनेजरला अमानुष मारहाण होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे, ही मारहाण आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून केल्याचे सांगितले जात असून, त्यात त्यांच्या पीएचा देखील सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामुळे बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा – धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रिय?
हा व्हिडिओ १२ डिसेंबर २०२४ रोजीचा असल्याचे सांगितले जात आहे, मात्र तो आताच का व्हायरल झाला, यावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी खात्यात २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे, धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने हा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आता सुरेश धस हे थेट ईडीकडे तक्रार करण्याच्या तयारीत असतानाच, त्यांच्याशी संबंधित सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या काही वादग्रस्त घटना समोर आल्या आहेत.
विरोधकांच्या विरोधात कारवाई की केवळ राजकीय खेळी?
धनंजय मुंडेंच्या विरोधात सातत्याने टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर, तो कोणत्या हेतूने पसरवला गेला यावर राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. १२ डिसेंबरचा हा व्हिडिओ आताच समोर कसा आला? हे अजूनही गूढच आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय हालचाली आणि पुढील संभाव्य कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.