Ajit Pawar : महायुती सरकारला बहुमत मिळून सत्ता स्थापन झाली असली तरी मंत्रिपद वाटपावरून अनेक नेते नाराज झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातही अशीच स्थिती पाहायला मिळाली. काहींना मंत्रीपद न मिळाल्याने तर काहींना अपेक्षित खाते न मिळाल्याने असंतोष होता. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत हा वाद टाळण्यासाठी अजित पवारांनी ‘सेफ खेळी’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पक्षासाठी काम केलेल्या आणि कोणताही वाद न उभा राहील अशा उमेदवाराला संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिर्डीच्या संग्राम कोते पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधान परिषद निवडणुकीत एक जागा येत आहे, मात्र इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पक्षांतर्गत असंतोष टाळण्यासाठी पवारांनी जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते यांना संधी देण्याचे ठरवले आहे. अशात शिर्डीचे संग्राम कोते पाटील हे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
त्यांनी पक्षसंघटनेत विद्यार्थी संघटनेपासून काम केले असून, पक्षफुटीनंतरही त्यांनी अजित पवारांची साथ कायम ठेवली. अलीकडेच शिर्डीत झालेल्या पक्षाच्या अधिवेशनाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यामुळे उद्या नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने आज त्यांच्या नावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
विधान परिषद निवडणुकीची परिस्थिती
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत असून, त्यातील तीन जागा भाजपच्या, तर प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, या जागांपैकी तीन जागांचा कार्यकाळ केवळ एक वर्षाचा आहे, तर उर्वरित दोन जागांपैकी एक जागा २०२३ पर्यंत आणि दुसरी २०२८ पर्यंत असेल.
पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र
या एकाच जागेसाठी अनेक दावेदार आहेत. विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणारे तसेच पराभूत झालेले नेतेही इच्छुक आहेत. परंतु, एका उमेदवाराला संधी दिल्यास इतर नाराज होण्याची शक्यता असल्याने अजित पवारांनी योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. जागेसाठी झिशान सिद्धीकी, आनंद परांजपे यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, तिन्ही पक्षांच्या आमदारांना मान्य होईल असा उमेदवार देण्याची आवश्यकता असल्याने कोते पाटील यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
ही निवडणूक पक्षीय संख्याबळ पाहता बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम निर्णय लवकरच स्पष्ट होईल.