Pimpri Chinchwad : पुण्यात भर रस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव अहुजा प्रकरणाची चर्चा थांबत नाही तोच, पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. नशेसाठी पैसे न मिळाल्याच्या रागात एका तरुणाने सोसायटीतील तब्बल १३ दुचाकींना आग लावली. स्वप्नील शिवशरण पवार असे या तरुणाचे नाव असून, हा प्रकार पिंपळे निलख भागात घडला आहे.
सीसीटीव्हीमध्ये कृत्य कैद, पोलिसांनी घेतली अटक
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील पवार हा उच्चशिक्षित असूनही व्यसनाच्या आहारी गेला आहे. आईने नशेसाठी पैसे न दिल्याने संतापलेल्या स्वप्नीलने सोसायटीतील दुचाकींना मध्यरात्री पेटवून दिले. सकाळी रहिवाशांना वाहनं जळाल्याचे समजल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात स्वप्नीलच हे कृत्य करत असल्याचे स्पष्ट दिसून आले.
यानंतर सोसायटीतील नागरिकांनी तातडीने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्वरित कारवाई करत स्वप्नीलला अटक केली.
आईनेच मागितली कठोर शिक्षा
या घटनेमुळे कुटुंबीयही संतापले असून, स्वप्नीलच्या आईनेच पोलिसांकडे त्याला शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “मुलगा उच्चशिक्षित असला तरी व्यसनामुळे त्याचा नाश होत आहे. पैसे न मिळाल्यास तो कुटुंबालाही जीवे मारण्याची धमकी देतो. त्याला सोडू नका, नाहीतर तो पुन्हा असाच काहीतरी करेल,” अशी भावनिक याचना त्याच्या आईने केली.
गुन्हेगारी वाढीला, पोलिस आणि नागरिकांना सतर्क राहण्याची गरज
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात दिवसेंदिवस अशा विकृत गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. समाजात अशांतता आणि भीती निर्माण करणाऱ्या अशा घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
दरम्यान, पुण्यात ट्रॅफिक सिग्नलवर लघुशंका आणि अश्लील वर्तन करणाऱ्या गौरव अहुजा याची पोलीसांनी धिंड काढत धडा शिकवला. अशा समाजविघातक कृत्यांवर कठोरात कठोर कारवाई करून आरोपींना धडा शिकवण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.