Valmik Karad : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मरळवाडी गावाचे सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाची घटना २९ जून २०२४ रोजी घडली होती. परळी शहरातील बँक कॉलनी भागात झालेल्या या गोळीबारात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे नेते वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात एक व्हिडिओ ट्विट करून, वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून २९ जून २०२४ रोजी महादेव गित्ते यांच्यावर हल्ला झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असलेल्या महादेव गित्ते यांचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
बापू आंधळे यांचा खून जुन्या वादातून झाला असल्याचे समोर आले होते, आणि त्यानंतर बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ निहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आव्हाड यांच्या ट्विटमुळे या प्रकरणात नवीन ट्विस्ट आल्याचे दिसत आहे.
महादेव गित्ते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ जून रोजी बापू आंधळे आणि त्यांचे साथीदार सोमनाथ सलगरे व सनी देवडे यांनी त्यांच्या घरावर हल्ला केला होता. महादेव यांनी घराबाहेर येण्यास नकार दिला असता, त्यांनी धमकी दिली की, “तू बाहेर आला नाहीतर तुला मारून टाकले जाईल.” त्यानंतर, जमावाने त्यांच्या घराबाहेर फायरिंग केले आणि त्यांची स्कॉर्पिओ गाडी फोडली. महादेव बाहेर आल्यावर, बापू आंधळे यांनी त्यांच्या छातीत बुक्की मारून हल्ला केला आणि जमावातील काही जणांनी गोळीबार केला, ज्यात महादेव गित्ते यांना पोटात गोळी लागली.
या प्रकरणात पोलिसांनी बापू आंधळे आणि इतर २० अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), १४३ (बेकायदेशीर जमाव), १४८ (शस्त्रांसह दंगल) आदी कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.