Swargate : धक्कादायक ! स्वारगेट प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपी गाडेने तरुणीला 7500 रुपये दिले नसल्याचा वकिलांचा दावा

Swargate : पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला पुणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

7500 रुपयांवरून विरोधाभास, वकिलांचे वक्तव्य बदलले

आरोपी दत्ता गाडे याचे वकील सुमित पोटे यांनी सुरुवातीला माध्यमांशी बोलताना पीडित महिलेला आरोपीने 7500 रुपये दिले होते, असा दावा केला होता. मात्र, न्यायालयात मात्र याबाबत कोणताही उल्लेख झालाच नाही, असे त्यांनी नंतर स्पष्ट केले.

यावर माध्यमांनी त्यांना थेट विचारले असता, “आम्हाला आरोपीने नंतर ही माहिती दिली, त्यामुळे आम्ही माध्यमांसमोर बोललो” अशी सारवासारव त्यांनी केली. मात्र, माध्यमांमध्ये काही वेगळे आणि न्यायालयात काही वेगळे बोलणे योग्य आहे का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

पोलिस कारवाई होणार का?

वकिलांनीच माध्यमांसमोर चुकीची माहिती दिल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत संभ्रम वाढला आहे. न्यायालयासमोर युक्तिवाद न करता, माध्यमांच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या वकिलांवर पोलीस काही कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

आरोपी गाडेचा नवा दावा, घटनेला वेगळेच वळण

या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून, सरकारने तातडीने कारवाई करत आरोपी गाडे याला अटक केली. मात्र, आरोपीच्या वकिलांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण प्रकरणावर वेगळीच चर्चा सुरू झाली.

गाडेने महिलेवर जबरदस्ती केली नसून, ती स्वतःहून त्याच्यासोबत आली होती, असा दावा केला आहे. त्याने सांगितले की, महिलेने त्याच्याकडून 7500 रुपये घेतले आणि तिथे तिचा एक एजंटही उपस्थित होता. त्यामुळे ही जबरदस्ती नव्हती, तर संमतीने घडलेली गोष्ट होती, असे त्याच्या वकिलांनी सांगितले होते.

7500 रुपयांचा मुद्दा गायब?

मात्र, आता न्यायालयात हा मुद्दाच उपस्थित करण्यात आलेला नाही, असे वकिलांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपीच्या वकिलांचे आधीचे आणि आताचे वक्तव्य पूर्णतः वेगळे असल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

संपूर्ण प्रकरणावर सगळ्यांचे लक्ष

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपीचा दावा आणि त्याचे वकील बदलत असलेली भूमिका यामुळे या प्रकरणात आणखी काही नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.