ताज्या बातम्याक्राईमराजकारण

Valmik Karad : वाल्मीक कराडचे नाव घेत भाजप नगरसेवकाने केला आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, घायवळ कनेक्शन समोर

Valmik Karad : रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुक लाईव्ह करत आपल्या व्यावसायिक अडचणी आणि स्थानिक गुंडांकडून होत असलेल्या त्रासाविषयी खुलासा केला. या घटनेनंतर तातडीने त्यांना मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

फेसबुक लाईव्हमध्ये व्यक्त केली नाराजी

भरत जाधव यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले की, “समाजात प्रामाणिकपणे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. मला वारंवार त्रास दिला जात आहे, त्यामुळेच मी हा टोकाचा निर्णय घेत आहे.” त्यांनी काही स्थानिक व्यक्तींची नावे घेत त्यांच्यावर दहशत माजवून त्यांच्या व्यवसायावर परिणाम करण्याचा आरोप केला आहे.

व्यावसायिक त्रासामुळे मानसिक तणाव

जाधव यांनी सांगितले की, त्यांनी कर्जत-जामखेड तालुक्यात बिल्डिंग व्यवसाय सुरू केला होता, मात्र, काही स्थानिक गुंडांनी त्यांना धमक्या देऊन काम थांबवण्यास भाग पाडले. “निलेश आणि सचिन घायवळ यांच्या गाड्या साईटवर येतात, त्यांच्या साथीदारांकडून दहशत माजवली जाते. त्यामुळे कोणतेही बुकिंग होत नाही आणि मला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे,” असे त्यांनी नमूद केले.

व्यवसायातील आर्थिक फसवणुकीचा आरोप

त्यांनी बीडमधील काही व्यावसायिकांवरही आरोप करत सांगितले की, “मी काही व्यावसायिकांना भागीदारी दिली, त्यांनी लाखोंचा नफा घेतला, मात्र नंतर आर्थिक वाद निर्माण करून मला अडचणीत टाकले. बोगस बिलांमुळे माझ्या कंपनीला त्रास सहन करावा लागत आहे.”

जमिनीच्या व्यवहारात अडथळे

जाधव यांनी जामखेडमध्ये मोठी जमीन खरेदी केली होती, मात्र स्थानिक राजकीय व्यक्तींनी कमिशन घेतल्यानंतरही रस्त्याचा प्रश्न प्रलंबित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. “रस्ता खोदला गेला, त्यामुळे मी जमीन विकू शकत नाही. राजकीय व्यक्तींनी माझ्या विरोधात कट रचला आहे,” असे त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले.

राजकीय सहकाऱ्यांकडूनही त्रासाचा आरोप

भरत जाधव यांनी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. “मी ज्यांना मदत केली, त्यांनीच माझ्यावर अन्याय केला. मला धमक्या देण्यात येत आहेत, शिवीगाळ केली जाते, माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे त्यांनी म्हटले.

पोलीस तपास सुरू

या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, भरत जाधव यांच्या आरोपांबाबत चौकशी केली जात आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button