Devendra Fadnavis : मुघल शासक औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च 1707 रोजी नगरच्या भिंगार किल्ल्यात झाला. त्याने स्वतःला खुलताबाद येथे दफन करण्याची इच्छा व्यक्त केली होती, आणि त्याच्या मुलगा आझम शहानं तिथेच त्याची कबर बांधली. आजही ही कबर औरंगाबादजवळ खुलताबाद येथे आहे.
मात्र, औरंगजेबाच्या कबरीला हटवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, बहुतांश लोकांना असेच वाटते की ही कबर हटवली पाहिजे, परंतु कायद्याच्या चौकटीत राहूनच कोणतेही निर्णय घ्यावे लागतात. तसेच, काँग्रेस सरकारच्या काळात या कबरीला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI)चे संरक्षण मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या विधानावर खासदार उदयनराजे भोसले संतप्त झाले असून, “औरंगजेबाची कबर ठेवण्याची गरजच काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “ती कबर उखडून टाका,” असे थेट शब्दांत त्यांनी मागणी केली.
हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनीही औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीवर सरकारने गेल्या 13 वर्षांत 6.5 लाख रुपये खर्च केले, तर शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ काही हजार रुपयांची मदत दिल्याचे सांगितले. त्यामुळे या कबरीवरील सरकारी अनुदान त्वरित रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या वादावर भाष्य करताना, सरकारने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे सांगितले. मात्र, औरंगजेबाच्या नावावरून हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करणे किंवा धार्मिक तेढ वाढवणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु झालेला हा वाद आता आणखी तापण्याची शक्यता असून, यावर कायदेशीर आणि प्रशासकीय निर्णय काय घेतले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.