Dhananjay Munde : “भ्रष्ट राजकारण्यांच्या मदतीला धर्मसत्ता धावते तेव्हा खंडणीतला वाटा त्यांनाही मिळालेला असतो”
Dhananjay Munde : राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून आधीच गोंधळ सुरु असताना, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी त्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे हा वाद अधिक चिघळला आहे. नामदेव शास्त्री यांच्या या भूमिकेवर टीका होत असून त्यांच्यावर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी हल्लाबोल केला आहे.
ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंची टीका
ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
“भ्रष्ट राजकारण्यांच्या मदतीला धर्मसत्ता धावते तेव्हा खंडणीतला वाटा त्यांनाही मिळालेला असतो,” असा थेट आरोप करत त्यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध
सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी देखील धनंजय मुंडे, नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. “न्यायाचार्य” पदवी लावणाऱ्या महंतांनी गुन्हेगारांचे समर्थन करणे धक्कादायक आहे. संत ज्ञानेश्वरांचे नाव घेणारे हे महंत एका हत्येच्या समर्थनात उभे राहतात, ही शरमेची बाब आहे.”
ते पुढे म्हणाले, “जर उद्या एखाद्या दहशतवाद्याने गुन्हा केला, तर त्यालाही हे महंत पाठिंबा देतील काय? गडावरील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी त्यांनी धनंजय मुंडेंना मदत केली आणि आता त्या मदतीची परतफेड करत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
पत्रकार प्रशांत कदम यांचा सवाल
पत्रकार प्रशांत कदम यांनीही महंत नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. “ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाबद्दल आम्हाला त्यांचा आदर आहे. परंतु, भगवान गडाच्या माध्यमातून राजकीय हस्तक्षेप होऊ नये, ही त्यांची पूर्वीची भूमिका होती. मात्र आता त्यांनीच धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ राजकीय भूमिका घेतली आहे.”
ते पुढे म्हणाले, “गंभीर गुन्ह्याच्या आरोपींसाठी सहानुभूती व्यक्त करणाऱ्या महंतांना हे शोभत नाही. समाजावर प्रभाव टाकण्यासाठी त्यांना मुंडेंची गरज का वाटावी?”
जितेंद्र आव्हाड यांची सडकून टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या संपूर्ण प्रकरणावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आणि नामदेव शास्त्री, धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्यावर तीव्र टीका केली.
महंत नामदेव शास्त्री आपला निर्णय बदलणार का?
प्रखर टीकेनंतर आता महंत नामदेव शास्त्री आपल्या भूमिकेवर ठाम राहणार की मागे हटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण वादामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील काही दिवसांत या प्रकरणावर नवे ट्विस्ट पाहायला मिळू शकतात.