ताज्या बातम्याक्राईमराजकारण

Dhananjay Deshmukh : ‘आम्ही जगू शकणार नाहीत, ते सर्व फोटो डिलीट करुन टाका’, धनंजय देशमुखांची मिडीयाला कळकळीची विनंती

Dhananjay Deshmukh : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे धक्कादायक फोटो आता समोर आले असून, या घटनेने राज्यभर खळबळ उडवली आहे. आरोपींनी किती अमानुषपणे त्यांची हत्या केली याचा मोठा खुलासा या फोटोंमधून होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या घटनेने संपूर्ण राज्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.

सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, ही हत्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्या आदेशावरून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कराड हा या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.

अमानुष हत्येचे भीषण तपशील

माध्यमांच्या हाती लागलेल्या फोटोंमध्ये हत्येच्या क्रूरतेचा अंदाज येतो. आरोपींनी संतोष देशमुख यांना पाईप, क्लच वायर, लोखंडी रॉड, साखळी, फायटर आणि दोर यांसारख्या वस्तूंनी निर्दयपणे मारहाण केली. त्यांचे अंगावरील कपडे फाडून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला. या प्रकारामुळे संतोष देशमुख यांचे कुटुंब आणि त्यांचे समर्थक भावनिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत व्यथित झाले आहेत.

परिवाराची माध्यमांना विनंती: ‘ते फोटो डिलीट करा!’

ही हत्याकांडाची भयावह दृश्ये पाहून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्याची विनंती केली आहे.

“जर समाजालाच न्यायालयापूर्वी शिक्षा द्यायची संधी मिळाली, तर आरोपींना लोकांच्या स्वाधीन करा. लोक त्यांना योग्य शिक्षा देतील. पण कृपया हे फोटो डिलीट करा. आम्ही हे सहन करू शकत नाही. आम्ही जिवंत राहू शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

‘ही जातीय हत्या नाही, गुन्हेगारांचा मानसिक विकृतीचा नमुना’

धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले की, या हत्येचा जातीयतेशी काहीही संबंध नाही. त्यांनी आरोपींच्या समर्थकांना जाहीर आव्हान दिले –

“ज्या लोकांनी सुरुवातीला या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आता समोर यावे आणि सांगावे की ते माणसांचे औलाद आहेत का? कारण हे कृत्य एका जातीचे नाही, तर ही मानसिक विकृती आहे.”

संतोष देशमुख यांच्या हत्येने निर्माण झालेली अस्वस्थता आणि संताप दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया कशी होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button