Dhananjay Munde : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत एक मोठा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्या आत्मसमर्पण प्रक्रियेबाबत महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणाचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर येऊ नये म्हणून त्यांनी वाल्मिक कराडला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये धनंजय मुंडे यांचे सहकारी बालाजी तांदळे यांचाही सहभाग होता. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या मते, आरोपींना शोधण्याचे काम पोलिसांऐवजी स्थानिक कार्यकर्त्यांनी केले. विशेष म्हणजे, बालाजी तांदळेने दोन वेगवेगळ्या लोकांना सांगितले की आरोपींच्या शोधासाठी 60-70 गाड्या फिरत होत्या, तर काहींना 200 गाड्या असल्याचे सांगण्यात आले.
अंजली दमानिया यांनी आरोप केला की, सीआयडीच्या आरोपपत्रात बालाजी तांदळे आणि संशयित पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही, जे गैर असून त्यांना सहआरोपी केले पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात एलसीबीचे अधिकारी गीत्ते यांचाही सहभाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या मते, धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉ. वायबसे आणि त्यांची पत्नी, एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय भागवत शेलार, पीआय महाजन आणि एलसीबी अधिकारी गीत्ते या दहा जणांना सहआरोपी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात यावेत.
याशिवाय, अंजली दमानिया यांनी शिंदे गटावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, कांदिवली परिसरात शिंदे गटाचा नेता लालसिंग राजपुरोहित हा जबरदस्तीने लोकांची दुकाने बळकावत आहे. त्यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, पीडित कुटुंबाला त्यांचे दुकान परत मिळवून द्यावे आणि राजकीय गुंडगिरी रोखावी.