Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात 2021 ते 2024 या कालावधीत तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोणतेही प्रत्यक्ष काम न करता 73 कोटी 36 लाख रुपयांची बोगस बिलं उचलून मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस बिलं उचलल्याचे कुठल्याही एका मतदारसंघात यापूर्वी पाहायला मिळालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार
आमदार सुरेश धस यांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण यादी त्यांच्याकडे असून, प्रत्यक्षात कोणतेही काम न करता कोट्यवधी रुपयांची बिलं उचलण्यात आली आहेत. उद्या होणाऱ्या डीपीडीसीच्या बैठकीत हा मुद्दा प्रामुख्याने मांडला जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हे प्रकरण मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“अजितदादांना त्यांच्या शिष्यांचा कारभार कळू द्या” – सुरेश धस
या संदर्भात बोलताना सुरेश धस यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. “अजितदादा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, सात वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत, त्यामुळे ते मला एकेरी बोलू शकतात. मात्र त्यांनी एवढेही प्रेम करू नये की त्यांच्या शिष्यांनी 70 कोटी रुपयांची बोगस बिलं उचलावीत,” असे ते म्हणाले.
बीडच्या बजेटपैकी 90 टक्के निधी परळीसाठी?
आमदार सुरेश धस यांनी हा आरोपही केला की, बीड जिल्ह्याचे 400 कोटी रुपयांचे नियोजन बजेट असून त्यातील तब्बल 90 टक्के निधी फक्त परळी मतदारसंघासाठी वापरण्यात आला. “लाखो मतांनी निवडून येण्यासाठी एवढा निधी परळीतच केंद्रित केला जातो, त्यामुळे इतर भाग दुर्लक्षित राहतो,” असा आरोपही त्यांनी केला.
“नायक चित्रपटासारखा एक दिवसाचा कार्यकारी अभियंता”
यावेळी बोलताना त्यांनी एक उपरोधिक टिप्पणी करत सांगितले की, “नायक चित्रपटात जसा अनिल कपूर एक दिवसासाठी मुख्यमंत्री होतो, तसेच संजय मुंडे एक दिवसासाठी कार्यकारी अभियंता होतोय. यात कुणाचा फायदा आणि कुणाचे नुकसान हेच समजेनासे झाले आहे.” तसेच, अजित पवारांच्या 10-15 पीएंना या भ्रष्टाचाराची माहिती देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हे संपूर्ण प्रकरण गंभीर असून, अधिकृत तक्रार झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.