Raj Thackeray : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ रोडवर भीषण अपघात झाला असून, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हा अपघात मंगळवारी (११ मार्च) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पिंपरी लिंबाळा मक्ता भागात घडला. अजिंक्य घुगे हे आपल्या कारने औंढा नागनाथ येथून हिंगोलीकडे जात असताना त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाशी जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की, कारचे इंजिन बाहेर फेकले गेले.
२५ वर्षीय अजिंक्य घुगे हे मनसे जिल्हाध्यक्ष बंडू कुठे यांचे भाचे होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये दिनेश पोले आणि निखिल पराडकर यांचा समावेश असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी श्यामकुमार डोंगरे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा या घटनेची अधिकृत नोंद करण्यात आली.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, स्थानिक नागरिकांसह मनसे कार्यकर्त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.