Gaurav Ahuja : ‘माझ्या मुलाने सिग्नलवर नाही, तर माझ्या तोंडावर लघवी केली’, संतप्त वडीलांची उद्विग्न प्रतिक्रिया

Gaurav Ahuja : पुण्यात महिलांविरोधातील अत्याचार आणि अश्लील वर्तनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवरील अत्याचाराचा प्रकार ताजा असतानाच आज पुन्हा एक संतापजनक घटना घडली आहे. येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात एका बड्या बापाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत वाहन थांबवून अश्लील कृत्य केले.

BMW गाडीतून उतरून खुलेआम बेशिस्त वर्तन

सकाळी शास्त्रीनगर चौकात BMW गाडीतून उतरलेल्या तरुणाने सर्वांसमोर फुटपाथवर लघुशंका केली. त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या तरुणाच्या हातात दारूची बाटली होती. स्थानिक नागरिकांनी त्याला जाब विचारला, तसेच काहींनी त्याचा व्हिडिओ देखील शूट केला. जाब विचारताच तरुणाने महिलांसमोर आणि कॅमेऱ्यासमोर अश्लील हावभाव केले आणि वेगाने गाडी निघून गेली.

व्हिडीओ व्हायरल, पोलिसांची कारवाई सुरू

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना तातडीने दखल घ्यावी लागली. संबंधित तरुणाचे नाव गौरव अहुजा असल्याचे समोर आले असून, तो फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी मोहिम राबवली आहे. गौरव अहुजाचे वडील मनोज अहुजा यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

वडिलांची प्रतिक्रिया – “माझ्या तोंडावर लघुशंका केल्यासारखे आहे!”

गौरव अहुजाचे वडील मनोज अहुजा, जे हॉटेल व्यवसायिक आहेत, त्यांनी मुलाच्या वागण्यावर नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.
“माझा मुलगा असल्याची लाज वाटते. त्याने सिग्नलवर लघुशंका केली नाही, तर थेट माझ्या तोंडावर केली आहे. त्याचा फोन सकाळपासून बंद आहे. पोलिसांनी माझ्यावर कारवाई केली, तरी मला हरकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांचा तपास सुरू

याबाबत पुणे झोन 4 चे डीसीपी हिंमत जाधव यांनी माहिती दिली आहे.

  • सकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला.
  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे.
  • गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींच्या नातेवाईक व मित्रांकडे चौकशी केली जात आहे.
  • आरोपी वाघोलीच्या दिशेने पळून गेला होता, मात्र नंतर माघारी आला.
  • आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.

कायद्याच्या कचाट्यात अडकणार?

पोलिसांनी गौरव अहुजा आणि त्याच्या सोबतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. शहरात वारंवार अशा घटना घडत असताना पोलिसांचा धाक उरला आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. आरोपींची लवकरच अटक होण्याची शक्यता असून, कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांची पावले पुढे सरसावली आहेत.