China : चीनमधील जिन्क्सी प्रांतातील ७० वर्षीय हुआंग पिंग यांनी सरकारच्या स्थलांतराच्या ऑफरला नकार दिल्यामुळे त्यांचा निर्णय आता त्यांच्यासाठी पश्चात्तापाचा कारण बनला आहे. पिंग यांनी महामार्गासाठी आपली जमीन आणि घर देण्यास नकार दिला होता. मात्र आता त्यांचे दुमजली घर महामार्गाच्या मधोमध उभे असून घराभोवती रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.
२ कोटी रुपयांच्या ऑफरला नकार देणाऱ्या पिंग यांची कहाणी
नवीन महामार्ग प्रकल्पासाठी सरकारने पिंग यांना त्यांच्या घराच्या बदल्यात तब्बल १.६ दशलक्ष युआन (सुमारे २ कोटी रुपये) देण्याची ऑफर दिली होती. मात्र, पिंग यांनी हट्ट धरत ही ऑफर नाकारली. त्यांनी घर सोडण्यास नकार दिल्याने सरकारने पर्यायी मार्ग शोधला आणि त्यांच्या घराभोवतीच रस्ता बांधण्यास सुरुवात केली.
धुळ-धोक्याने वेढलेले जीवन
पिंग सध्या आपल्या ११ वर्षांच्या नातवासोबत त्या घरात राहतात. मात्र, महामार्गाच्या बांधकामामुळे सततचा आवाज, धूळ, आणि हादऱ्यांमुळे त्यांचे जीवन अस्वस्थ झाले आहे. दिवसभर घरात राहणे त्यांच्यासाठी कठीण झाले असून ते बराचसा वेळ शहरात घालवतात. घराच्या छताची पातळी आता रस्त्याच्या पातळीवर असल्याने घराचा वापर देखील त्रासदायक ठरतो आहे.
“वेळ परत फिरवता आली असती तर…”
मीडिया रिपोर्टनुसार पिंग यांनी आपली चूक कबूल केली आहे. ते म्हणाले, “जर मला वेळ परत फिरवता आली असती, तर मी सरकारच्या ऑफरला सहमती दिली असती. आता असं वाटतंय की मी मोठी रक्कम गमावली आहे, आणि मला त्याचा खूप पश्चात्ताप आहे.”
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर पिंग यांच्या घराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांचे घर महामार्गाच्या मध्यभागी असल्याचे स्पष्ट दिसते. घराकडे जाण्यासाठी लोक लांब आणि उंच बोगद्यांमधून जाताना दिसतात. घर खाजगी मालकीचे असूनही ते धुळीने भरलेले आणि बांधकाम उपकरणांनी वेढलेले आहे.
धडा घेण्यासाठी योग्य उदाहरण
हुआंग पिंग यांच्या निर्णयामुळे त्यांचे जीवन अधिक त्रासदायक बनले असून, मोठी आर्थिक रक्कमही त्यांच्या हातून गेली. हा प्रसंग स्थानिक नागरिकांसाठी आणि इतरांसाठी एक धडा ठरत आहे, की अशा परिस्थितीत सरकारसोबत सहकार्य करणे कधीही चांगले.