Valmik Karad : ज्योती जाधवला वाल्मिक कराडपासून दोन मुलं; दुसऱ्या पत्नीच्या नावावरील मोठं घबाडही आलं उघडकीस

Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडला मकोका कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्याच्या विविध कारवायांचे एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

त्यापैकी एक म्हणजे पुण्यातील प्राइम लोकेशनवर असलेल्या दोन ऑफिस स्पेस त्याने ज्योती जाधव नावाच्या महिलेच्या नावावर खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आणखी एक महत्वाची माहिती पुढे आली आहे की, ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची(Valmik Karad) दुसरी पत्नी असून त्यांना दोन मुलं आहेत. तसेच ज्योती जाधव हिच्या नावावर पुण्यात करोडो रुपयांची मालमत्ता आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संशयित आरोपी वाल्मिक कराड(Valmik Karad) पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर त्याच्या नावावर असलेल्या आणि बेनामी मालमत्तांबाबत अनेक खुलासे झाले. त्याला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी भाषणादरम्यान दावा केला होता की, ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची(Valmik Karad) दुसरी पत्नी आहे. त्यानंतर, पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील कुशल वॉल स्ट्रीट इमारतीत वाल्मिक कराडने ज्योती जाधवच्या नावावर दोन ऑफिस स्पेस खरेदी केल्याची माहिती समोर आली.

वाल्मिक कराडने ज्योती जाधवच्या नावावर फक्त ऑफिस स्पेसच नव्हे, तर हडपसरमधील एमेनोरा पार्क टाऊनशिपमध्ये दोन फ्लॅट्स, खराडी येथे एक फ्लॅट खरेदी केला आहे. या सर्व मालमत्तांची किंमत कोटींच्या घरात आहे. त्याचप्रमाणे, ज्योती जाधवकडून वाल्मिक कराडला दोन मुले असून त्यांच्या नावावर देखील त्याने मालमत्ता खरेदी केल्याचे समजते.

कराड खंडणी प्रकरणात फरार असताना काही काळ ज्योती जाधवकडे राहिल्याचेही समोर आले आहे. पुणे महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या नोंदीनुसार, वाल्मिक कराडच्या पहिल्या पत्नी मंजली यांच्या नावावर वाकडमधील मि कासा बेला सोसायटीतील फ्लॅट 1 एप्रिल 2016 पासून आहे.

तसेच पिंपरी-चिंचवडच्या पार्क स्ट्रीट सोसायटीत 2021 मध्ये खरेदी केलेला चार बेडरूमचा फ्लॅटदेखील त्याच्या नावावर आहे. या फ्लॅटचा महापालिकेला कर थकवण्यात आला होता, त्यामुळे फ्लॅटचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, 16 जानेवारी रोजी 1 लाख 55 हजार 444 रुपयांचा थकलेला कर भरल्यानंतर महापालिकेने लिलाव प्रक्रिया थांबवली, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली आहे.