Sambhaji Maharaj : संभाजी महाराजांबद्दल दिग्गज क्रिकेटपटूंचे गौरवोद्गार; ‘छावा’ पाहून भारावले अन् म्हणाले म्हणाले…
Sambhaji Maharaj : सध्या बॉलिवूड आणि सोशल मीडियावर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र झळकत आहे. सिनेमागृहापासून ते सोशल मीडियापर्यंत, छावा चित्रपटावरून प्रेक्षक आणि सेलिब्रिटीजच्या प्रतिक्रिया ऐकू येत आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्यासाठीच्या बलिदानाची आणि शौर्याची कथा साकारणाऱ्या या चित्रपटाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ‘अतिशय उत्तम’ असे म्हटले आहे. मराठी आणि हिंदी सेलिब्रिटीजच्या बरोबरच माजी क्रिकेटर आकाश चोप्रा आणि टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांनीही या चित्रपटाचे भरघोस कौतुक केले आहे.
आकाश चोप्राने ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक प्रभावी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, “आज ‘छावा’ पाहिला. शौर्य, निस्वार्थीपणा आणि कर्तव्याच्या जाणिवेची अविश्वसनीय कथा.” त्यांनी या चित्रपटामुळे त्यांच्या मनात उमटलेला एक प्रश्नही मांडला आहे.
त्यांनी विचारले आहे, “आम्हाला शाळेत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजिबात का शिकवले गेले नाही? शाळेतील शिक्षणात त्यांचा उल्लेख का नाही? आम्हाला अकबर हा महान आणि न्यायी सम्राट कसा होता हे शिकवले गेले, पण दिल्लीत औरंगजेब रोड नावाचा रस्ता का आहे? हे कसे झाले?” असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
दुसरीकडे, गौतम गंभीर यांनी ट्विटरवर छत्रपती संभाजी महाराजांच्या मातृभूमीप्रतीच्या निस्सीम भक्तीचा उल्लेख करताना म्हटले आहे, “छत्रपती संभाजी महाराज – मातृभूमीची निस्सीम भक्ती.” त्यांच्या या ट्वीटमुळे संभाजी महाराजांच्या स्वराज्यासाठीच्या समर्पणावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने 150 कोटींचा टप्पा गाठला असून, सिनेमागृहात अजूनही प्रेक्षकांची गर्दी दिसून येत आहे. चित्रपटातील अनेक दृश्ये प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारी आहेत, तर चित्रपटाचा शेवट पाहून डोळ्यांतून अश्रू ढाळणारा आहे. या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आणि त्यांच्या इतिहासाची ओळख आजच्या पिढीपर्यंत दृकश्राव्य माध्यमातून पोहोचली आहे.
अशाप्रकारे, ‘छावा’ चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच यश मिळवलेले नाही, तर त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटामुळे आजच्या पिढीला स्वराज्यासाठी झगडणाऱ्या महान योद्ध्यांच्या बलिदानाची जाणीव निर्माण झाली आहे.