Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये २८ वर्षीय तरुणाने पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्यूपूर्वी तरुणाने सुसाईड नोट लिहून आईसाठी भावनिक संदेश तसेच भारत सरकार आणि अविवाहित तरुणांसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे.
सुसाईड नोटमध्ये आईसाठी संदेश
मृत तरुणाने सुसाईड नोटमध्ये आपल्या आईसाठी लिहिले की, “माझ्या जाण्याने रडू नकोस आणि इतरांनाही रडू देऊ नकोस. जर तुम्ही दु:खी झालात, तर मृत्यूनंतरही मला त्रास होईल. मी पुन्हा तुझ्या मुलाच्या रूपात परत येईन.” या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या
तरुण इव्हेंट फोटोग्राफर नितीन पडियार होता. कुटुंबीयांच्या मते, हुंड्याच्या ३० लाख रुपयांच्या मागणीमुळे आणि पत्नीच्या सततच्या जाचामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. सुसाईड नोटमध्ये नितीनने पत्नी वर्षा शर्मा, सासू सीता शर्मा, आणि मेहुणी मीनाक्षी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सरकारला आणि तरुणांना केलेले आवाहन
नितीनने सुसाईड नोटमध्ये भारत सरकारकडे विनंती करताना लिहिले आहे की, “हुंडाबंदी कायद्यात बदल करावा, कारण महिला त्याचा गैरवापर करत आहेत. अशा कायद्यांमुळे अनेक कुटुंबांचे नुकसान होत आहे.” तरुणांना उद्देशून त्याने लग्न करू नका, असे आवाहन केले आहे. तसेच, लग्न करायचे असेल, तर करार करूनच लग्न करा, असा सल्लाही त्याने दिला आहे.
तपास सुरू
या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, घटनेचा तपास सुरू आहे. नितीनचे राजस्थानमधील वर्षा शर्मासोबत प्रेमविवाह झाले होते. मात्र, सततच्या वादांमुळे दोघांचा घटस्फोट झाला होता. तरीही पत्नीचा जाच सुरूच होता, असे नितीनने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
समाजाला आणि सरकारला प्रश्न
ही घटना केवळ एका कुटुंबाचे दुःखच नाही, तर समाजातील महिलाविरोधी कायद्यांच्या गैरवापराचा प्रश्न उपस्थित करते. या घटनेने हुंडाबंदी कायद्यांच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा विचारमंथन होण्याची गरज आहे.