Kesari Prithviraj Mohol : अहिल्यानगर येथे पार पडलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने विजय मिळवत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत केले. दोघांमध्ये रंगतदार कुस्ती झाली, मात्र अखेरच्या क्षणी महेंद्र गायकवाडने मैदान सोडले, त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजेता घोषित केले.
पृथ्वीराज मोहोळचा थरारक विजय
अंतिम लढतीत दोन्ही मल्लांनी उत्तम खेळ केला. दोघांचे समान (1-1) गुण असताना अखेरच्या 16 सेकंदात महेंद्र गायकवाडने आखाडा सोडला, त्यामुळे पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आले. या विजयाबद्दल त्याला सन्मानाची चांदीची गदा आणि महिंद्रा थार गाडी देण्यात आली. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत पृथ्वीराजने वडिलांना खांद्यावर घेऊन मैदानात आनंदोत्सव साजरा केला.
शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड निलंबित
या स्पर्धेतील उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची कुस्ती अवघ्या एका मिनिटात संपली, कारण पृथ्वीराजने राक्षेला चितपट केले. मात्र हा निर्णय मान्य नसल्याने शिवराज राक्षेने पंच दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालत त्यांना लाथ मारली. या प्रकारामुळे पंचांनी सामूहिक निषेध केला, आणि शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.
कुस्ती हा शिस्तबद्ध खेळ मानला जातो, मात्र खेळाडूंनी शिस्तभंग केल्याने कुस्तीगीर संघटनेने नाराजी व्यक्त केली. तरीही या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळने आपल्या कुश्ती कौशल्याने सर्वांची मने जिंकली आणि महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला.