Kalyan : कल्याण पूर्व येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगातील थार वाहन चढवण्याचा आणि त्याला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न सोमवारी दुपारी घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या प्रकरणी श्लोक सावंतच्या आईने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
थार वाहनाने जीव घेतायचा प्रयत्न, अपहरणाचा कट?
श्लोक सावंत हा बिर्ला महाविद्यालयात शिक्षण घेतो. सोमवारी दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर तो आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून घरी निघाला होता. मात्र, त्याच्या नकळत **सुयश तिवारी नावाचा तरुण थार वाहनाने त्याचा पाठलाग करत होता. श्लोकला याची जाणीव नव्हती, पण लोकग्राम परिसरात घराजवळ पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
श्लोक मित्राच्या दुचाकीवरून उतरून घरी चालत जात असताना, *सुयश तिवारीने अचानक थार वाहन त्याच्यावर चढवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो या धडकेत थोडक्यात बचावला. मात्र, यानंतर सुयशचे दोन साथीदार गाडीतून उतरले आणि त्यांनी श्लोकला मारहाण करून जबरदस्तीने वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला. श्लोकने विरोध करताच *त्याने मोठ्याने आरडाओरडा केला. गर्दी जमू लागल्याचे पाहून आरोपींनी तिथून पळ काढला.
श्लोकच्या आईचा सवाल – मराठी माणूस महाराष्ट्रातही असुरक्षित का?
या घटनेनंतर श्लोकच्या आई जुही सावंत यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी संताप व्यक्त करत, “मराठी माणसांनी फक्त परप्रांतीयांच्या हातचा मार खात राहायचा का? महाराष्ट्रात मराठी माणूस सुरक्षित आहे की नाही?” असा थेट सवाल केला आहे.
पोलीस काय म्हणतात?
या प्रकरणाची चौकशी सुरू असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ही घटना अपहरणाचा प्रकार वाटत नाही, तर कॉलेजमधील वादातून झालेली आहे. या संदर्भात आधीच एनसी दाखल झाली आहे, आणि आता फिर्यादीकडून पुन्हा तक्रार आली आहे. यावर योग्य ती कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांमध्ये संताप, कठोर कारवाईची मागणी
या घटनेमुळे *कल्याण शहरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिक आणि मराठी संघटनांनी यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.