Brazil : विवाह हे प्रत्येक तरुण-तरुणीचे स्वप्न असते. मात्र, काही ठिकाणी सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे हे स्वप्न अपूर्ण राहते. ब्राझीलमधील ‘नोइवा’ नावाच्या गावात तब्बल 600 हून अधिक तरुणी विवाहासाठी प्रतीक्षेत आहेत, पण त्यांना योग्य वर मिळत नाही.
पुरुष कमी, विवाहासाठी वधू मात्र प्रतीक्षेत
या गावात लिंग गुणोत्तर असंतुलित आहे. गावातील बहुतांश पुरुष रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करतात आणि पुन्हा गावात परतत नाहीत. परिणामी, गावात फक्त महिला आणि काही वयस्क पुरुषच राहतात. गावातील महिला शेती, पशुपालन आणि इतर सर्व कामे स्वतः करतात, त्यामुळे त्या स्वावलंबी आहेत, पण तरीही जीवनसाथीच्या अभावामुळे त्यांचे वैयक्तिक जीवन अपूर्ण राहते.
नवरदेवांसाठी विशेष ऑफर – पण अट काय?
गावातील महिला विवाहासाठी इतक्या उत्सुक आहेत की, त्या वराच्या आर्थिक मदतीसुद्धा करण्यास तयार आहेत. मात्र, त्यासाठी एक अट आहे—लग्नानंतर नवऱ्याने गावातच राहिले पाहिजे. याच कारणामुळे बहुतेक पुरुष या लग्नांना नकार देतात.
कठोर नियमांमुळे पुरुष गाव सोडतात
गावातील काही जुने परंपरागत नियम आणि बंधने पुरुषांना मान्य नाहीत, त्यामुळे ते गाव सोडणेच पसंत करतात. ज्या पुरुषांनी लग्न केले, त्यांनी गावात राहून या नियमांचे पालन करावे, अशी महिलांची अपेक्षा आहे. मात्र, बहुतेक पुरुषांना हे स्वीकारणे कठीण वाटते, म्हणून ते गावात स्थायिक होण्यास तयार नसतात.
नोइवा गाव – बदलत्या समाजाची झलक
नोइवा गावाची ही परिस्थिती बदलत्या सामाजिक व्यवस्थेचे उदाहरण आहे, जिथे पारंपरिक विवाहसंस्थेला नव्या जीवनशैलीच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. गावातील महिला आत्मनिर्भर असल्या तरी जीवनसाथीच्या प्रतीक्षेत आहेत. भविष्यात हे चित्र बदलते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!