Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना क्लीनचिट देणाऱ्या नामदेव शास्त्रींचे मतपरिवर्तन, आता म्हणतात, आम्ही देशमुख कुटूंबाच्या..
Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवनवीन खुलासे होत असून, या प्रकरणानंतर अखेर धनंजय मुंडेंनी मंगळवारी (4 मार्च) राजीनामा दिला. संतोष देशमुख यांच्यावर निर्दयीपणे झालेल्या मारहाणीचे अंगावर काटा आणणारे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर हा राजीनामा दिला गेला.
विशेष म्हणजे, धनंजय मुंडेंना क्लीन चिट देणारे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आता त्यांच्यावरील पाठिंबा काढून घेतल्याचे स्पष्ट केले आहे. सुरुवातीला, संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग नसल्याचे सांगणारे नामदेव शास्त्री आता वेगळेच मत मांडत आहेत.
“पहिल्या दिवशी दिलेल्या वक्तव्याच्या वेळी मला पूर्ण कल्पना नव्हती. मात्र, नंतर धनंजय देशमुख यांच्याशी भेट घेतल्यानंतर माझे मत बदलले. भगवानगड आता देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे,” असे नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केले.
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील आर्थिक संबंधांबाबत आरोप होत असतानाच, पूर्वी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवला होता. “धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत, ते गुन्हेगार नाहीत हे मी शंभर टक्के सांगू शकतो,” असे त्यांनी आधी सांगितले होते. मात्र, आता त्यांची भूमिका बदलल्याचे दिसत आहे.
नामदेव शास्त्रींचे नव्याने मत परिवर्तन कसे झाले?
संतोष देशमुख हत्येच्या पहिल्या दिवशी दिलेल्या वक्तव्याच्या वेळी संपूर्ण माहिती नसल्याचे नामदेव शास्त्री यांनी सांगितले. “नंतर धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाने या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली, त्यामुळे माझी भावना बदलली. भगवानगड आता देशमुख कुटुंबाच्या बाजूने आहे. न्यायालयाने या प्रकरणाची तातडीने सुनावणी करून न्याय द्यावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.
31 जानेवारी 2025 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी, “धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप समाजासाठी मोठे नुकसान करणारे आहेत,” असे विधान केले होते. मात्र, नंतर धनंजय देशमुख यांनी 2 फेब्रुवारी 2025 रोजी भगवानगडावर धडक देऊन पुरावे सादर केले. यानंतर, 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी नामदेव शास्त्रींनी आपली भूमिका बदलली. यामुळे या प्रकरणाला आणखी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.