Nashik : प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, तरूणीने प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत 16 जणांची नावं

Nashik : नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे प्रेमसंबंधांना सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे एका तरुण-तरुणीने रेल्वेखाली झोकून देत जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर नांदगाव पोलिसांनी 16 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

प्रेमसंबंध आणि सामाजिक दबाव

फिर्यादी गोविंद नवनाथ मिटके यांच्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण उज्ज्वला रामकृष्ण खताळ (रा. वंजारवाडी, ता. नांदगाव) हिचे ज्ञानेश्वर माधव पवार याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गावातील काही लोकांनी या नात्याला तीव्र विरोध करत दोघांवर मानसिक दबाव टाकला आणि वारंवार आत्महत्येच्या धमक्या दिल्या. या सततच्या छळामुळे अखेरीस उज्ज्वला आणि ज्ञानेश्वरने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

व्हॉट्सॲप संदेशातून आत्महत्येची माहिती

दि. 11 मार्च 2025 रोजी रात्री 8.50 वाजता उज्ज्वलाने आपल्या भावाला व्हॉट्सॲपवर एक चिठ्ठी पाठवली, ज्यात 16 जणांच्या धमक्यांमुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता. ही माहिती मिळताच गोविंद मिटके आणि त्यांचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यासाठी मनमाड पोलीस ठाण्यात गेले. मात्र, तेथेच त्यांना समजले की उज्ज्वला आणि ज्ञानेश्वर यांनी शनिदेव मंदिराजवळील रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली आहे.

गुन्हा दाखल, आरोपींवर कारवाई सुरू

घटनेनंतर नांदगाव पोलिसांनी अरुण गायकवाड, संतोष पवार, नवनाथ जाधव, संजय सोनवणे, सुनिता पवार यांसह 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींची चौकशी सुरू आहे.

सामाजिक दबावामुळे पुन्हा एक दुर्दैवी घटना

ही घटना प्रेमसंबंधांवरील सामाजिक बंधनांमुळे होत असलेल्या अन्यायकारक घटनांचे उदाहरण आहे. प्रेमसंबंध स्वीकारण्यास समाजाचा विरोध आणि त्यातून होणारा मानसिक छळ यामुळे अजून किती निष्पाप जीव गमवावे लागणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.