Mahakumbh Mela : प्रयागराजला एकाच बसमधून उतरले, ‘ते’ १२० जण AI कॅमेऱ्यात कैद; चेंगराचेंगरीमागे नेमकं कोण?

Mahakumbh Mela : महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांची संख्या सरकारच्या अधिकृत आकड्यांपेक्षा जास्त असल्याचा आरोप विरोधी पक्षांसह विविध स्तरांतून केला जात आहे. राज्यसभेत सपा खासदार जया बच्चन यांनीही मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याचा गंभीर आरोप केला.

घातपाताचा संशय, एसटीएफ तपासात सक्रिय

मौनी अमावास्येच्या दिवशी संगमावर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली, ज्यात सरकारी आकड्यानुसार ३० जणांचा मृत्यू झाला. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काही मृतदेहांवर ६० पेक्षा जास्त क्रमांक लिहिलेले होते, ज्यामुळे मृतांचा आकडा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तपास यंत्रणांना काही संशयास्पद हालचाली आढळल्या आहेत. महाकुंभमध्ये गर्दी नियंत्रित करण्यासाठी बसवलेले एआय कॅमेरे एकाच बसमधून आलेल्या १२० जणांना टिपले आहेत. हे लोक गोंधळ घालण्यासाठी आले असावेत, असा संशय असून चौकशी सुरू आहे. तसेच छोट्या विक्रेत्यांनाही विचारपूस केली जात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष टीम (एसटीएफ) तयार करण्यात आली आहे.

तीन ठिकाणी चेंगराचेंगरीचा दावा

दैनिक भास्करच्या अहवालानुसार, महाकुंभमध्ये एक नाही, तर तीन ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. दुसऱ्या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा काही रुग्णालयांच्या अहवालावरून करण्यात आला आहे.

काही मृतदेहांवर क्रमांक लिहिल्याचे आढळले असून, नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलेले मृतदेह आणि रुग्णालयातील मृतदेह यांचा आकड्याशी मेळ बसत नाही. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. तपास यंत्रणा घातपाताचा कोणताही दुवा शोधत असून, महाकुंभसारख्या भव्य मेळाव्यात सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी हायलाइट झाल्या आहेत.

Leave a comment