Pakistan : पाकिस्तानला मोठं यश, अखेर जाफर एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांची सुटका, बलूच आर्मीच्या 33 बंडखोरांचा मृत्यू

Pakistan : बलुचिस्तानमधील बोलन येथे हायजॅक करण्यात आलेल्या जाफर एक्सप्रेसवरील हल्लेखोरांचा पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे. पाकिस्तान हवाईदल, लष्कर, फ्रंटियर कोर आणि स्पेशल सर्व्हिस ग्रुप (एसएसजी) यांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या 33 बंडखोरांना ठार मारण्यात आले, अशी माहिती पाकिस्तान सरकारने दिली आहे.

या हल्ल्यात 21 प्रवासी आणि 4 सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला, तर संपूर्ण 440 प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.

हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम

11 मार्च दुपारी 1 वाजता दहशतवाद्यांनी बोलनमधील रेल्वे ट्रॅक स्फोटाने उडवत जाफर एक्सप्रेस हायजॅक केली होती. प्रवाशांना ओलीस ठेवून ते सॅटेलाइट फोनद्वारे अफगाणिस्तानातील त्यांच्या सूत्रधारांशी संपर्कात होते.

सुरक्षा दलांचे मोठे रेस्क्यू ऑपरेशन

पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, काल संध्याकाळी 100 प्रवाशांची सुटका करण्यात आली होती, तर आज उर्वरित प्रवाशांना वाचवण्यात यश आले.

या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा मोठा खात्मा करत ट्रेनवरील नियंत्रण पुन्हा मिळवले. पाकिस्तान सरकारने या कारवाईला “दहशतवादाविरोधातील मोठे यश” असे संबोधले आहे.