Rahul Solapurkar : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा गदारोळ माजला आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“अशा लोकांना ठेचलं पाहिजे” – उदयनराजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक आहेत. “महाराजांनी कधीच स्वार्थ पाहिला नाही, त्यांनी सर्व समाजाला एकत्र ठेवण्याचा विचार केला,” असे सांगत उदयनराजे भोसले यांनी राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.
“राहुल सोलापूरकर कोण आहे? अशा लोकांच्या जिभा छाटल्या पाहिजेत. याला देशद्रोहाचा कायदा लावला पाहिजे. जनतेने त्याला दिसेल तिथे ठेचलं पाहिजे,” असे उदयनराजेंनी संतापाने म्हटले.
तसेच, त्यांनी पुढे असेही सांगितले की “छत्रपतींचे विचार जपले नाहीत, तर देशाचे तुकडे होतील. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे.”
“तो जिथे दिसेल तिथे बदडून काढा” – आमदार सुरेश धस
आमदार सुरेश धस यांनीही राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर कडाडून टीका केली आहे. “राहुल सोलापूरकर नावाचा नालायक नट काहीही बडबड करतो आहे. तो जिथे दिसेल, तिथे लोकांनी त्याला बदडून काढावं,” असे धस यांनी म्हटले.
तसेच, त्यांनी विचारले की “अशा विकृती महाराष्ट्रात निर्माणच कशा होतात?” यासारख्या वक्तव्यांमुळे जनतेच्या भावना दुखावल्या जात असून, “अशांना वठणीवर आणण्यासाठी कठोर कारवाई झाली पाहिजे,” असेही ते म्हणाले.
वाद आणखी वाढण्याची शक्यता
राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी प्रतिक्रिया उमटत आहे. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या वादामुळे राज्यात नव्या वादळाची शक्यता निर्माण झाली आहे.