Rahul Solapurkar : वेदानुसार आंबेडकर ब्राह्मण, त्यांना दत्तक घेतले होते! राहूल सोलापूरकरांचं पुन्हा वादग्रस्त विधान

Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करून टीकेचे धनी ठरलेले अभिनेते राहुल सोलापूरकर आता नव्या वादात सापडले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर आणखी टीका होत आहे.
सोलापूरकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचे वक्तव्य एका मुलाखतीत केले. त्यांच्या या विधानावर समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रिपाइं (खरात गट) चे नेते सचिन खरात यांनी सोलापूरकर यांना माफी मागण्याची मागणी केली आहे.
शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावर आधीच संताप
याआधी, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटण्यासाठी लाच दिल्याचा दावा सोलापूरकर यांनी केला होता. “महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी लाच दिल्याचे पुरावे आहेत,” असे त्यांनी म्हटले होते. या विधानावर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. वाढत्या विरोधामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.
बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त विधान
नवीन वाद निर्माण करणाऱ्या विधानात सोलापूरकर म्हणाले, “रामजी सकपाळ नावाच्या बहुजन कुटुंबात जन्मलेले भीमराव, आंबवडेकर नावाच्या एका गुरुजींकडून दत्तक घेतले गेले. त्यामुळे त्यांनी ‘आंबेडकर’ हे नाव घेतले. त्यांनी प्रचंड अभ्यास करून वेदांमध्ये नमूद केलेल्या ‘सब ब्रम्ह जानेती इति ब्राह्मण:’ या तत्त्वानुसार बाबासाहेब ब्राह्मण ठरतात.”
या विधानानंतर सामाजिक आणि राजकीय स्तरावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.
जितेंद्र आव्हाड यांचा सोलापूरकरांना इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “राहुल सोलापूरकर, शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलून समाजात तेढ निर्माण करण्याची गरज काय? तुम्ही बाबासाहेबांना ‘अरे-तुरे’ म्हणता? आम्ही म्हणू शकतो, कारण ते आमचे बाप आहेत. तू त्यांना तुझा बाप म्हणशील का? तुला इतक्या स्वातंत्र्याचा अधिकार बाबासाहेबांनीच दिला. पण तुझ्या शब्दांची जबाबदारी घे. हे शब्द परत घे, नाहीतर मी तुला झोडणार!” असा थेट इशारा त्यांनी दिला.
वाद चिघळण्याची शक्यता, माफीची मागणी
सोलापूरकर यांच्या विधानानंतर वाद आणखी चिघळण्याची शक्यता असून, विविध संघटना आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सचिन खरात यांनीही सोलापूरकर यांनी त्वरित माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.
राज्यात हा वाद चांगलाच पेटला असून, सोलापूरकर यांची यावर पुढील प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.