Raj Thackeray : पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) १९ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार भाष्य करत महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीवर टीका केली.
सोशल मीडियावरून वातावरण तापवले जाते – राज ठाकरे
राज ठाकरे यांनी भाषणात सांगितले की, सध्या राज्यात जाणूनबुजून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचे मेंदू फिरवले जात आहेत. गुढीपाडव्याला आम्ही दांडपट्टा फिरवणार,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, महाराष्ट्रात राजकारण्यांनी चिखल फेकण्याचे काम सुरू केले असून, “राजकीय फेरीवाले राज्यात आले आहेत, पण ते आमच्या पक्षात नाहीत,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे काही राजकीय नेत्यांवर निशाणा साधला.
पक्ष संघटनावर भर – कामचुकारांना पदावर ठेवणार नाही
मनसेच्या संघटनात्मक बांधणीवर भर देत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कामगिरीचा सज्जड इशारा दिला. “पक्षातील प्रत्येकाच्या कार्याचा दर १५ दिवसांनी आढावा घेतला जाईल. जर कुणी कामचुकारपणा केला, तर त्याला पदावर ठेवणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
कुंभमेळ्यावरून टोला – गंगा अजूनही स्वच्छ नाही
राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील स्नानावरही टीका करत “गंगा स्वच्छ होणार असल्याचे मी राजीव गांधींपासून ऐकत आलो आहे. बाळा नांदगावकर यांनी कुंभमेळ्यातून माझ्यासाठी गंगेचे पाणी आणले होते, पण मी ते पिण्यास नकार दिला,” असे सांगितले. त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
गुढीपाडव्याला मोठी घोषणा?
यावेळी राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी “सर्व कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर उपस्थित राहावे,” असे आवाहन केले. तसेच “११ मार्चला पक्षातील जबाबदाऱ्या वाटप केल्या जातील,” असे जाहीर केले. मात्र, काही गोष्टी सध्या सांगता येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे राज ठाकरे गुढीपाडव्याला कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची राजकीय युती होण्याच्या चर्चेला वेग आला आहे. मात्र, दोन्ही नेत्यांनी यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.