Swargate : सहमतीने संबंध, पण पैशांवरुन वाद झाल्यामुळे…, स्वारगेट अत्याचार प्रकरणात रुपाली पाटलांचा वेगळाच दावा
Swargate : स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे, जो आधीच पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे, त्याने तरुणीला ‘ताई कुठे जायचं आहे?’ असे विचारून तिचा विश्वास संपादन केला आणि तिला रिकामी बस दाखवून तिच्यावर अत्याचार केला.
आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने, सुरुवातीला तरुणीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, नंतर तिने तिच्या मित्राला सर्व हकिकत सांगितली, ज्यामुळे त्याने तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला आणि प्रकरण उघड झाले.
या प्रकरणाला एक वेगळे वळण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विधानांमुळे मिळाले आहे. त्यांनी हा प्रकार संमतीने झालेल्या संबंधांवरून पैसे न दिल्यामुळे घडल्याचा दावा केला आहे. त्यांनी फेसबुकवर याबाबत पोस्ट लिहून आपले मत मांडले आहे. त्याआधी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही या प्रकरणात जबरदस्ती झाली नसल्याचे विधान केले होते.
रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, बस स्टँड घटनेत पुणे नाहकच बदनाम झाले. एका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून.. याचा प्रचंड खेद वाटतो. दुसरे, बस स्टँड आगराची… व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार बाहेर आला. आता त्यांना सुट्टी नाही. नोकरीवर काम चोख करा नाहीतर घरी बसा कायमचे. तूर्तास एवढेच….
आरोपी गाडे याला अटक केल्यानंतर तो नातेवाईकांकडे पाणी मागण्यासाठी गेला होता, जिथे त्याने आपले पश्चात्ताप व्यक्त करत माफी मागितली.
आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद खळबळजनक होता. वकिलांनी सांगितले की, आरोपी आणि पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले होते आणि कोणत्याही प्रकारचे अत्याचार झाले नाहीत. तसेच, मुलगी स्वतःहून बसमध्ये गेल्याचा दावा त्यांनी केला. वकिलांनी आरोपीची सोशल मीडियावर ट्रायल झाल्याचा आक्षेप घेतला आणि फक्त दोन दिवसांची कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने आरोपीला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता या प्रकरणाचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.