Sanjay Kakade : माजी खासदार आणि बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्या, मात्र त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार कौटुंबिक कारणांमुळे घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रुग्णालयाच्या प्रवक्ते अली दारुवाला यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत, उषा काकडे यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले आहे. अधिकृतरीत्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, उपचारानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संजय काकडे कोण आहेत?
संजय काकडे हे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक असून, ‘संजय काकडे ग्रुप’ या कंपनीचे संस्थापक आहेत. 1986 पासून त्यांनी रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.
राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने पाहता, 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पुण्यात महत्त्वपूर्ण यश मिळवले. 2019 लोकसभा निवडणुकीतही त्यांना जबाबदारी देण्यात आली होती, जी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
बांधकाम क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर त्यांनी सरकारच्या टेंडर प्रक्रियेत महत्त्वाचे बदल घडवून आणले, ज्यामुळे पुणे महानगरपालिकेचे 800 कोटी रुपये वाचल्याचा दावा केला जातो. एकेकाळी राज्यसभेचे सदस्य असलेल्या काकडे यांनी अनेक मतदारसंघांमध्ये पक्षासाठी काम केले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत.