ताज्या बातम्यामनोरंजन

Shambhuraj : शंभुराजांना औरंगजेबानं हालहाल करुन मारलं; पण नंतर महाराणी येसूबाई अन् त्यांच्या मुलासोबत काय केलं?

Shambhuraj : छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात प्रचंड गाजत आहे. अवघ्या चार दिवसांत 130 कोटींचं बजेट वसूल करणाऱ्या या चित्रपटाने 200 कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचत अनेक विक्रम मोडले आहेत.

चित्रपटात संभाजी महाराजांचे बलिदान, त्यांची शौर्यगाथा आणि पराक्रमाचे रोमांचकारी चित्रण पाहायला मिळते. विशेषतः क्लायमॅक्समधील प्रसंग डोळ्यात पाणी आणतो आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अपार धैर्याची जाणीव करून देतो.

संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडवर मोठा हल्ला

मुघल बादशहा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून क्रूर अत्याचारानंतर त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर, 12 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांचे सावत्र भाऊ राजाराम महाराज यांना छत्रपती घोषित करण्यात आले. मात्र, त्यांच्या गादीवर येण्याने मराठा साम्राज्यात अस्थिरता निर्माण झाली.

25 मार्च 1689 रोजी मुघल सैन्याने रायगडवर हल्ला करून किल्ला ताब्यात घेतला. त्यावेळी संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई, त्यांचा मुलगा शहाजी आणि शिवाजी महाराजांची पत्नी सकवरबाई यांना कैद करण्यात आले.

मराठ्यांचा प्रतिकार आणि शाहू महाराजांची कैद

राजाराम महाराजांनी राजधानी रायगडवरून दक्षिणेतील जिंजीला हलवली, तर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी गनिमी काव्याने मुघल सैन्याला सतत भिडून ठेवले.

संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज यांना केवळ सातव्या वर्षी मुघलांनी कैद केले. ते तब्बल 18 वर्षे (1689 ते 1707) औरंगजेबाच्या ताब्यात होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, 1707 मध्ये त्याचा मुलगा सम्राट मुहम्मद आझम शाह याने शाहू महाराजांना मुक्त केले, परंतु यामागे मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव होता.

शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यात सत्ता संघर्ष

मुक्ततेनंतर शाहू महाराजांना त्यांच्या काकी महाराणी ताराबाई यांच्याशी गादीसाठी लढावे लागले. ताराबाई यांनी त्यांचा मुलगा शिवाजी दुसरा याला गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे शाहू महाराज आणि ताराबाईंमध्ये सत्तासंघर्ष उभा राहिला.

मुघलांनी शाहू महाराजांच्या सुटकेच्या अटी घालून, येसूबाईंना बंदिवान ठेवले. मात्र, 1719 मध्ये शाहू महाराज आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली मराठे बळकट झाले आणि येसूबाईंना मुक्त करण्यात आले.

मराठा साम्राज्याची सूत्रे पेशव्यांच्या हाती

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (1707) मराठ्यांचा प्रभाव वाढत गेला आणि पुढे मराठा साम्राज्याची सत्ता पेशव्यांच्या ताब्यात आली. संभाजी महाराजांचे बलिदान, शाहू महाराजांचा संघर्ष आणि मराठ्यांचे मुघलांविरोधातील सातत्यपूर्ण युद्ध यामुळे मराठा साम्राज्य अधिक भक्कम होत गेले आणि पुढील काळात दिल्लीपर्यंत मराठ्यांचा झेंडा फडकला.

Related Articles

Back to top button