Nagpur : नागपूरमधील विवाहितेच्या हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती उघड, प्रियकराने मृतदेहावर केला बलात्कार

Nagpur : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. विवाहित प्रेयसीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे प्रियकराने तिचा गळा आवळून निघृण हत्या केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने मृतदेहावरही बलात्कार केला.

या अमानुष प्रकाराचा खुलासा त्या महिलेच्या मुलीमुळे झाला, जी शाळेतून घरी आल्यानंतर तिला मृत अवस्थेत आढळली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत 25 वर्षीय आरोपी रोहित गणेश टेकाम याला अटक केली.

प्रेमसंबंधातून भयानक गुन्हा

32 वर्षीय मृत महिला मूळची मध्यप्रदेशची होती. सहा वर्षांपूर्वी ती आणि तिचा पती कामाच्या शोधात नागपुरात आले. पती एका ढाब्यावर कामाला जात असल्याने तो सकाळी घर सोडून मध्यरात्रीच परतत असे. दरम्यान, त्या महिलेची ओळख रोहित टेकाम या बांधकाम मिस्त्रीशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, आणि पती नसताना रोहित वारंवार तिच्या घरी येत असे.

गुरुवारी, 6 फेब्रुवारी रोजी, पती कामावर गेल्यानंतर महिलेने रोहितला घरी बोलावले. त्यांनी दारू घेतली आणि जेवण केले. त्यानंतर रोहितने शारीरिक संबंधांची मागणी केली. मात्र, महिलेने नकार दिल्याने तो संतापला. “मग मला घरी का बोलावले?” असा सवाल करत त्याने तिच्यावर हल्ला चढवला. तिचा नकार कायम राहिल्याने, संतप्त रोहितने ओढणीने तिचा गळा आवळून तिचा खून केला. इतकेच नव्हे, तर त्यानंतर तिच्या मृतदेहावरही बलात्कार करून तो फरार झाला.

मुलीच्या आगमनानंतर उघडकीस आला गुन्हा

सायंकाळी शाळेतून घरी परतलेल्या मुलीने आईला निष्प्राण अवस्थेत पाहिले आणि तात्काळ शेजाऱ्यांना बोलावले. पोलिसांना कळवण्यात आले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याची पुष्टी झाली, तसेच मृतदेहावर बलात्कार झाल्याचे उघड झाले.

तपासादरम्यान, पोलिसांनी संजनाच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्डिंग तपासले आणि रोहितवर संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला अटक केली. चौकशीत रोहितने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पुढील तपास सुरू

पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेण्यात येणार आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला कोणी मदत केली का, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागपूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.