Hingoli : विद्यार्थिनीवर ५ महिने अत्याचार अन् नंतर धमकावून गर्भपात; ठाकरेंच्या खासदाराच्या शाळेतील भयानक प्रकार उघड
Hingoli :हिंगोली जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील तामसा येथे एका शाळेतील मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचे आरोप आहेत.
या प्रकरणात आरोपी मुख्याध्यापकाविरुद्ध तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी राजूसिंह चौहान हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. घटनेच्या तपशीलांनुसार, आरोपी मुख्याध्यापकाने मुलीच्या पालकांना तिच्या हुशारीबद्दल प्रशंसा करून तिला पोलीस अकॅडमीमध्ये भरती करण्याचे आश्वासन दिले.
या बहाण्याने त्याने मुलीला नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याच्या नावाखाली आपल्या वाहनातून नेले आणि गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. अनेक महिने हा प्रकार चालू असताना मुली गरोदर झाली. ही बाब समजल्यावर आरोपी शिक्षकाने धमकी देऊन तिचा गर्भपात केला.
नंतर मुलीने ही घटना आपल्या पालकांना सांगितली आणि तिच्या आईने तामसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोस्को कायद्याखाली गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ तामसा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपी मुख्याध्यापकाची तात्काळ अटक, गर्भपात करणाऱ्या डॉक्टरावर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, घटनेची माहिती मिळताच आरोपी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आष्टीकर यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या घटना सहन करण्यात येणार नाहीत आणि आरोपी नराधमाला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. या घटनेमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील गुरु-शिष्य संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. समाजातील लोक या घटनेच्या निंदा करत आहेत आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आवाज उठवत आहेत.