Sonali Bendre : ..म्हणून मला स्वत:ला अस्सल महाराष्ट्रीयन बोलायला संकोच वाटतो, सोनाली बेंद्रेची राज ठाकरेंच्या कार्यक्रमात कबुली
Sonali Bendre : मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर ‘अभिजात पुस्तक प्रदर्शन २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या ‘छावा’ सिनेमाचा नायक विकी कौशल, पद्मश्री पुरस्कार विजेते अशोक सराफ, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांसारख्या कलाकारांनी कार्यक्रमात हजेरी लावली. मात्र, सर्वांच्या नजरा अभिनेत्री सोनाली बेंद्रेकडे लागल्या होत्या. सोनाली बेंद्रे खूप काळानंतर मराठी कार्यक्रमात दिसली.
या वेळी तिने एक धक्कादायक विधान केले की, स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणण्यास तिला थोडा संकोच वाटतो. तिच्या या विधानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
कार्यक्रमादरम्यान सोनाली बेंद्रेने आपले मत मांडताना सांगितले, “सर्व मान्यवरांना नमस्कार, आज मी महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींसमोर उभी आहे, हे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. पण, सुरुवातीलाच एक कबुली देऊ इच्छिते – मला स्वतःला अस्सल महाराष्ट्रीयन म्हणायला थोडा संकोच वाटतो. माझा जन्म बेंद्रेंची सोनाली म्हणून झाला असला तरी माझे बालपण भारतभर फिरण्यात गेले, कारण माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टिंगवर होते.”
सोनाली पुढे म्हणाली, “आम्ही इतके वेळा घर बदलले की पुढच्या शिफ्टिंगचा विचार आधीच करायचे. मात्र, एक गोष्ट कायम होती – आमच्या घरातला मराठी बाणा. कितीही भाषांचा अभ्यास केला असला तरी आमच्या घरात मराठीच बोलले जायचे. त्यामुळे मी स्वतःला पूर्ण महाराष्ट्रीयन म्हणू शकत नसले तरी मराठी माझ्यासाठी घरासारखे आहे – सुरक्षित, उबदार आणि जवळचे. लहानपणी मराठी साहित्याशी फारशी ओढ नव्हती, पण हिंदी चित्रपटसृष्टीत काम करताना मराठी वाचन थोडं कमी झालं.”
सोनाली बेंद्रेच्या सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘हम साथ साथ है’ मधील तिची भूमिका विशेष गाजली होती. तिने सलमान खान सोबत जोडी बांधून अनेक सिनेमे गाजवले आहेत. याशिवाय, ‘सरफरोश’, ‘दिलजले’, ‘डुप्लिकेट’, ‘इंद्रा’, ‘कहो ना कहो’ या चित्रपटांमध्येही तिने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.