Kesari Competition : अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या ६७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली आहे. अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत करत महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला. अखेरच्या काही क्षणांत महेंद्र गायकवाडला चितपट करत पृथ्वीराज मोहोळने मानाची गदा उंचावली. त्याच्या विजयानंतर चाहत्यांनी जल्लोष साजरा केला.
कुस्ती मैदानात गोंधळ, पंचांवर हल्ला
मात्र, या प्रतिष्ठेच्या स्पर्धेनंतर मोठा गोंधळ उडाला. उपांत्य फेरीत शिवराज राक्षेचा पराभव झाल्यानंतर त्याने पंचांच्या निर्णयाला आक्षेप घेत वाद घातला. एवढ्यावरच न थांबता शिवराजने पंचाची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारण्याचा धक्कादायक प्रकार घडवला.
महेंद्र गायकवाडच्या समर्थकांनीही गोंधळ घातला
अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडच्या पराभवानंतर त्याच्या समर्थकांनीही पंचांशी हुज्जत घातली, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. गोंधळ वाढल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करत जमावाला पांगवावे लागले.
शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड निलंबित
या घटनेनंतर कुस्ती संघटनेने कठोर भूमिका घेत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना तीन वर्षांसाठी निलंबित केले आहे. यासोबतच पंचांनी ठिय्या आंदोलन करत शिवराजच्या आक्रमक वर्तनाचा निषेध नोंदवला.
पृथ्वीराज मोहोळचा शानदार विजय
अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळने अखेरच्या क्षणांपर्यंत संघर्ष करत महेंद्र गायकवाडला चितपट केले. त्याच्या दमदार कामगिरीमुळे पुण्याच्या कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ही स्पर्धा विजयानंतर जितकी गाजली, तितकीच वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत राहिली आहे.