rice : भात हा आपल्या रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे, पण तुम्ही जे तांदूळ खात आहात, त्यात सूक्ष्मप्लास्टिकचे कण असू शकतात आणि त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत, ज्यामुळे चिंता वाढली आहे.
प्रा. डॉ. अनिल गोरे, प्रा. गोविंद कोळेकर, कुमारी पिनल भावसार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतभरातील विविध तांदळाच्या नमुन्यांचे विश्लेषण केले. या अभ्यासात 100 ग्रॅम तांदळात सरासरी 30.8 ± 8.61 कण सूक्ष्मप्लास्टिक आढळले. हे कण प्रामुख्याने पॉलीएथिलीन (PE) आणि पॉलीएथिलीन टेरेफ्थेलेट (PET) या प्रकारातील होते. हे संशोधन ‘जर्नल ऑफ हाझार्डस मटेरिअल्स’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
कर्करोगाचा धोका, महिलांमध्ये जास्त प्रमाणात सेवन
संशोधनानुसार, तांदळातील सूक्ष्मप्लास्टिक कण हे कर्करोग, श्वसनाचे विकार आणि पचनाशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरू शकतात. विशेष म्हणजे, पुरुष आणि मुलांच्या तुलनेत महिलांमध्ये सूक्ष्मप्लास्टिकचे सेवन अधिक प्रमाणात आढळले आहे.
सावधगिरी आणि उपाययोजना
संशोधकांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना तांदळाच्या लागवडीत आणि साठवणुकीत पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, तांदूळ शिजवण्याआधी स्वच्छ पाण्यात किंवा मिठाच्या पाण्यात जास्त वेळा धुवावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
आधुनिक जीवनशैलीचा परिणाम
आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे अन्नात रसायने, प्लास्टिक आणि विषारी घटक मोठ्या प्रमाणात मिसळले जात आहेत. माणसाचे जीवन सोपे करणारे घटक आता त्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे या गोष्टींचे गांभीर्य ओळखून योग्य बदल करण्याची वेळ आली आहे.