Uday Samanta : मुंबई-गोवा महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, मेसर्स आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागातील सहा अधिकाऱ्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, ही कंपनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वडिलांच्या नावे असल्याचे सांगितले जात आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने सरकार व अन्य प्रतिवादींना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महामार्गाच्या पॅचवर्कमध्ये मोठा घोटाळा?
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १७-१८ वर्षांपासून रखडलेले असले, तरी महामार्गावरील खड्डे भरण्याच्या कामातही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मेसर्स आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीने रस्त्यांवर डांबर न लावताच कोट्यवधी रुपयांचे बिले उचलल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकेतील गंभीर आरोप
- तळंकाटे ते वाकेडदरम्यानच्या पॅचवर्कमध्ये गैरव्यवहार.
- निवळी-जयगड रस्त्यावर डांबर वापरल्याचा बनाव करून, साडे आठ कोटींपेक्षा जास्त रक्कम सरकारकडून वसूल केली.
- सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा झाल्याचा आरोप.
अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी
या गैरव्यवहारात सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकारी सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये एल.पी. जाधव, आर.पी. कुलकर्णी, रविकुमार बैरवा, के.एस. रहाटे, स्नेहा मोरे आणि जे.एच. धोत्रेकर यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
न्यायालयाचा पुढील आदेश ९ एप्रिलला
हा घोटाळा २०२३ मध्ये झाल्याचा आरोप असून, त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे वडील, आई आणि भाऊ – विद्यमान आमदार किरण सामंत हे कंपनीच्या संचालक मंडळावर होते. त्यामुळे कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी ही जनहित याचिका दाखल केली असून, न्यायालयाने यावर ९ एप्रिल रोजी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.