Uttar Pradesh : प्रेमापायी १५ लाख खर्च करून केला लिंगबदल, पोलिसांत तक्रारीनंतर समोर आला वेगळाच प्रकार; नेमकं काय घडलं?

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एका तरुणीने प्रेमासाठी लिंग बदल करून आपल्या मैत्रिणीसोबत विवाह केला. जवळपास सात वर्षांपासून त्या दोघी प्रेमसंबंधात होत्या. आपल्या नात्याला सामाजिक स्वीकार मिळावा, यासाठी या तरुणीने तब्बल १५ लाख रुपये खर्च करून लिंग बदल शस्त्रक्रिया करून पुरुष बनण्याचा निर्णय घेतला.

सध्या या जोडप्याने पती-पत्नी म्हणून मथुरेत एकत्र संसार सुरू केला आहे. मात्र, ही घटना समोर आली तेव्हा एका वेगळ्याच प्रकरणामुळे पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला.

पोलिसांचा हस्तक्षेप आणि प्रेमी जोडप्याचा निर्णय

लिंग बदललेल्या तरुणीच्या पत्नीच्या कुटुंबियांनी तिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवत तिला मथुरेत शोधून काढले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले, मात्र त्या दोघी सज्ञान असल्याने आणि आपली इच्छा एकत्र राहण्याची असल्याचे स्पष्ट केल्याने पोलिसांनी त्यांना लेखी सहमतीपत्र लिहून सोडून दिले.

प्रेमाची सुरुवात आणि लिंग बदलाचा प्रवास

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील सविता ही २०१७ मध्ये जयपूरमध्ये शिक्षणासाठी आली होती. तेथे तिची ओळख शेजारी राहणाऱ्या एका तरुणीशी झाली आणि दोघींमध्ये मैत्री झाली. हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली.

करोनाच्या काळात दोघी काही काळ वेगळ्या राहिल्या, पण त्यांचं फोनवर सतत संपर्क होत होता. २०२१ मध्ये *त्यांची पुन्हा भेट झाली आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, या नात्याला समाजमान्यता मिळावी म्हणून सविताने लिंग बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

सविताने डॉक्टर असलेल्या नातेवाईकांकडून माहिती घेतली आणि शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतही मागितली. इंदौरमधील एका रुग्णालयात १० महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा शस्त्रक्रिया करून सविता पुरुष बनली आणि तिने आपले नाव बदलून ललितसिंह केले.

लग्न आणि घरच्यांचा विरोध

ललितसिंह (पूर्वीची सविता) आणि त्याच्या पत्नीने नोव्हेंबर २०२४ मध्ये जयपूर येथे लग्न केले. मात्र, ललितसिंहच्या पत्नीच्या कुटुंबाला या विवाहाबाबत कोणतीही कल्पना नव्हती. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात केली असता तिने शिक्षणासाठी बाहेर जाण्याचा बहाणा केला आणि निघून गेली.

काही दिवस फोन बंद झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली, पण ती सापडली नाही. अखेर १५ जानेवारीला तिला बेपत्ता असल्याची तक्रार जयपूर पोलिसांकडे नोंदवण्यात आली.

पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करून जोडप्याला शोधले

पोलिसांनी तिचे शेवटचे मोबाईल लोकेशन ट्रॅक केले आणि ते मथुरेत असल्याचे आढळले. तपासासाठी पोलीस मथुरेत पोहोचले असता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. दोघींनीही आपले प्रेम स्पष्ट करत सज्ञान असल्याने एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांनी दोघांना लेखी जबाब घेऊन सोडून दिले.

सध्या हे प्रेमी जोडपे मथुरेत पती-पत्नी म्हणून राहत असून ललितसिंहने आपल्या प्रेमासाठी घेतलेला धाडसी निर्णय चर्चेचा विषय बनला आहे.