Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात ३० जानेवारी रोजी एका महिलेकडून ३२ वर्षीय पुरुषाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शारीरिक संबंधादरम्यान गळा आवळून त्याचा जीव घेतल्याची कबुली आरोपी महिलेने पोलिसांसमोर दिली आहे. ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने हा टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.
ब्लॅकमेलिंगमुळे हत्या
मृत व्यक्तीचे नाव इक्बाल असून तो आरोपी महिलेचा शेजारी होता. काही दिवसांपासून तो महिलेला एका कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे ब्लॅकमेल करत होता. यापूर्वी त्याने महिलेवर जबरदस्ती केल्याचेही उघड झाले आहे. त्याच्या सातत्याच्या त्रासाला कंटाळून महिलेला हा कठोर निर्णय घ्यावा लागला.
हत्या कशी घडली?
३० जानेवारीच्या रात्री महिलेने योजनाबद्ध पद्धतीने इक्बालला तिच्या घरी बोलावले. त्याला बेशुद्ध करण्यासाठी तिने एका गोळ्यांचे सेवन करायला लावले आणि आपल्या पतीच्या चहातही तीच गोळी मिसळायला सांगितली. त्यामुळे तिचा पती बेशुद्ध पडला. त्यानंतर मध्यरात्री १२ वाजता महिलेसह दोघेही इक्बालच्या घरी गेले. त्या वेळी शारीरिक संबंधादरम्यान महिलेने त्याचा गळा आवळून हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपीने इक्बालचा मृतदेह पायऱ्यांपर्यंत ओढत आणला आणि घरातून निघून गेली. सकाळी शेजाऱ्यांना त्याचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत पाहिले असता, इक्बाल मृत अवस्थेत आढळून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत कळवले.
पोलिस तपास आणि आरोपीची कबुली
१ फेब्रुवारी रोजी इक्बालच्या पत्नीने आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल केली. सुरुवातीला आरोपीने हत्येतील सहभाग नाकारला. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तिने खून केल्याची कबुली दिली.
“इक्बाल सतत मला ब्लॅकमेल करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळूनच मी त्याची हत्या केली,” असे आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.