Valmik Karad : बीड येथील मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. सद्यस्थितीत या प्रकरणाची न्यायालयीन, एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरू असून, एक आरोपी वगळता सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या हत्येचा मुख्य हेतू खंडणी असल्याचे स्पष्ट झाले असून, हत्येवेळी घेतलेले फोटोही दोषारोपपत्राच्या माध्यमातून समोर आले आहेत. या घटनाक्रमामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे.
आज, 12 मार्च रोजी, या प्रकरणाची पहिली सुनावणी केज जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडणार आहे. सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख उपस्थित राहणार आहेत. मात्र, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम या सुनावणीसाठी उपस्थित राहणार नाहीत. तसेच, आरोपी वाल्मिक कराडने आपला वकील बदलला असून, अॅड. खाडे हे आता त्याची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे या सुनावणीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चार्जशीट दाखल झाल्यानंतर, धनंजय देशमुख यांनी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायप्रविष्ठ बाबी समजून घेण्यासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजते.
सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे बाजू मांडणार आहेत. तर, आरोपी वाल्मिक कराडची बाजू अॅड. खाडे हे मांडतील. याआधी अशोक कवडे हे वाल्मिक कराडचे वकील होते, मात्र, आता कोल्हापूर येथील अॅड. खाडे हे त्याचे काम पाहणार आहेत.
सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्या मते, आज सकाळी 11 वाजता सुनावणी अपेक्षित आहे. आरोपींना जेलमधून केज न्यायालयात आणले जाणार की नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आरोपींच्या वतीने त्यांचे वकील हजर राहतील आणि काही अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच, बीडमध्ये ही केस चालवावी, यासाठी एसआयटीने अर्ज केला होता, ज्यावर 18 मार्च रोजी सुनावणी होईल.
आजच्या सुनावणीत आरोपींचे वकील दोषारोपपत्रात नसलेल्या काही अतिरिक्त माहितीची मागणी करणार असल्याचे समजते. विशेषतः साक्षीदारांचे जबाब, आरोपींचे जबाब आणि दोषारोपपत्रात उल्लेख असलेल्या फोन कॉल्सचा तपशील (सीडीआर) आरोपींच्या वकिलांकडून मागवला जाणार आहे. त्यामुळे, या सुनावणीत काय निष्कर्ष निघतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.