Tukaram Mundhe : जालना, बीड आणि परभणीत वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्या मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही मागणी मांडली.
मराठवाड्याला सक्षम अधिकाऱ्याची गरज – दमानिया
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याने सरकारने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. “मराठवाड्यासाठी एक निर्भीड, सक्षम आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडणारा अधिकारी हवा. त्यामुळे आता बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंढे करण्याची वेळ आली आहे,” असे दमानिया म्हणाल्या. त्यांनी राज्य सरकारला तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याचे आवाहन केले आहे.
धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरूनही टीका
धनंजय मुंडे हे मंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतरही सरकारी बंगला खाली करत नसल्याने, अंजली दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “त्यांनी स्वतःहून हा बंगला सोडला पाहिजे होता. जर तसे होत नसेल, तर त्यांच्या सामानाची बाहेर फेकून सरकारी मालमत्ता ताब्यात घ्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
2007 मधील गुन्हेगारी प्रकरणाची फेरतपासणीची मागणी
2007 मध्ये बीडमध्ये घडलेल्या एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणावर त्यांनी प्रकाश टाकला. त्या काळात, धनंजय मुंडे, रामेश्वर मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी किशोर फड यांना धमकावून त्यांची गाडी पेटवून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव पुढे काढण्यात आले नव्हते.
त्यावेळी धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांच्या हातात रिव्हॉल्व्हर होती, आणि त्यांनी किशोर फड यांना ठार मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप आहे. “ही केस पुन्हा उघडण्यात यावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी,” अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली.
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
या प्रकरणावर राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुकाराम मुंढे यांची मराठवाड्यात नियुक्ती होते की नाही, तसेच 2007 च्या गुन्हेगारी प्रकरणाचा पुनर्विचार होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.