CT scan : CT स्कॅनसाठी मशीनमध्ये जाताच झाला महिलेचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

CT scan : ब्रिटनच्या नॉर्थम्प्टन जनरल हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅनदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 66 वर्षीय इव्होन ग्रॅहम यांना सीटी स्कॅनसाठी घेण्यात आले असता, स्कॅनपूर्वी दिलेल्या डाय (कॉन्ट्रास्ट मीडियम) इंजेक्शनमुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

मुलीने उपस्थित केले महत्त्वाचे प्रश्न

इव्होन ग्रॅहम यांच्या 36 वर्षीय मुलीने, योलांडाने, या घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, आईला डायच्या अ‍ॅलर्जीची माहिती असताना हे इंजेक्शन देण्यात आले नसते, तर तिचे प्राण वाचले असते. तसेच, स्कॅन रूममध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘एपिपेन’ (EpiPen) असते, तर आईचा जीव गेला नसता, असा तिचा दावा आहे.

काय घडले नेमके?

इव्होन ग्रॅहम या स्टेज-३ किडनीच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्या फुगलेल्या पोटाच्या तपासणीसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. स्कॅनपूर्वी डाय इंजेक्शन देताच त्यांना अ‍ॅलर्जिक प्रतिक्रिया झाली आणि तातडीने हृदयविकाराचा झटका आला.

पोस्टमॉर्टम अहवाल काय सांगतो?

घटनेनंतर दहा महिन्यांनी आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात सांगण्यात आले की, इव्होन ग्रॅहम यांचा मृत्यू ‘अ‍ॅनाफिलेक्टिक रिअ‍ॅक्शन’मुळे झाला. ही एक अत्यंत गंभीर अ‍ॅलर्जिक प्रतिक्रिया असून, शरीराला अ‍ॅलर्जेनचा सामना सहन न झाल्यास ती अचानक प्राणघातक ठरू शकते.

NHS काय म्हणते?

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) च्या माहितीनुसार, सीटी स्कॅनमध्ये वापरण्यात येणाऱ्या डायची अ‍ॅलर्जी दुर्मिळ असते. मात्र, यामुळे अशक्तपणा, घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

हा मृत्यू टाळता आला असता का? हॉस्पिटल प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली होती का? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.